कोल्हापूर : राज्य सरकारच्या मंत्री समितीने राज्यातील साखर कारखाने १ डिसेंबरला सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करावा. तत्पूर्वी जिल्ह्यातील साखर कारखाना प्रतिनिधींसमवेत बैठक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी साखर सहसंचालक सचिन रावळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.दुपारी संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने लक्ष्मीपुरी येथील साखर सहसंचालक कार्यालयात सचिन रावळ यांची भेट घेतली. यावेळी निवेदन सादर करून चर्चा केली.मंत्री समितीने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सन २०१६-१७ मध्ये उसाची लावण पाहता ऊस हंगाम लांबल्याने उसाचे वजन कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी सन २०१६-१७चा उस गळीत हंगाम सुरू करण्याची तारीख १ नोव्हेंबर २०१६ ही जाहीर करावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान व आडसाली लावण करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. त्याचबरोबर २०१५-१६ ऊस गळीत हंगामातील ‘एफआरपी’ रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. ती न केल्यास कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. सन २०१६-१७ ऊस गळीत हंगामातील ऊस क्रमवारीने घ्यावा, अशा विविध मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय भोकरे, चंद्रकांत भोसले, भारत चव्हाण, तानाजी आंग्रे, प्रकाश पाटील, बाजीराव पाटील, अभिजित किणे, के. के. राजिगरे, प्रवीण पालव, अभिजित बुकशेठ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयात गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने साखर सहसंचालक सचिन रावळ यांची भेट घेऊन ऊस गळीत हंगाम दि. १ नोव्हेंबरपासून सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, संजय भोकरे उपस्थित होते.
हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करावा
By admin | Published: October 07, 2016 12:45 AM