शहर आणि परिसरात गत तीन महिन्यांपासून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग फैलावत चालला आहे. यामध्ये शहापूर भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शहापूर परिसरात कामगारांची वस्ती असून, तोरणानगर, कृष्णानगर, कारंडे मळा, कॉ. मलाबादेनगर असे दाट लोकवस्तीचे भाग आहेत. या भागात कोरोनाचा फैलाव होत असून, सर्वसामान्यांना होम क्वारंटाईन होऊन उपचार घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी शहापूर परिसरातील नितीन कोकणे, भाऊसो आवळे, उदयसिंग पाटील, रणजित अनुसे, किसन शिंदे, प्रधान माळी, बंडोपंत मुसळे, तानाजी हराळे, नितीन जांभळे, लतिफ गैबान यांच्यासह ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मिळून शहापूर परिसरासाठी स्वतंत्र विलगीकरण केंद्र मिळण्याची मागणी केली आहे. त्यासाठी भागातील नगरपरिषदेच्या शाळा क्र. १४, ४३ व ५५ या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असल्याने ही ठिकाणे निश्चित केली आहेत. शहापूरमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा विचार होऊन याठिकाणी स्वतंत्र विलगीकरण केंद्र सुरू करण्यास तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. या विलगीकरण केंद्रातील नागरिकांवर उपचार करण्यास स्थानिक डॉक्टर, परिचारिका यांनीही तयारी दर्शविली असल्याचे कोकणे यांनी सांगितले.
शहापूर भागासाठी स्वतंत्र विलगीकरण केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:22 AM