कोल्हापूर : कोल्हापुरात १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती महोत्सवाला शनिवारपासून दिमाखात प्रारंभ झाला. ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष, छत्रपती शिवरायांचे पोवाडे, फडफडणाऱ्या भगव्या झेंड्यांसह हलगीच्या कडकडाटवर घुमणाऱ्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी वातावरण शिवमय झाले आहे. मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठेत सलग आठवडाभर विविध कार्यक्रमांनी शिवोत्सव रंगणार आहे.शिवाजी तरुण मंडळाच्या अश्वारूढ शिवपुतळ्याची मिरवणूकशिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था, तरुण मंडळे एकत्र येऊन शिवाजी तरुण मंडळाच्या पुढाकाराने पेठेचा मध्य असणाऱ्या उभा मारुती चौकात शिवजयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्त चौकात भव्य अशी गडकिल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे.
शनिवारी सकाळी दसरा चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले. तेथे आमदार चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक अनिल गुजर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, उत्सव कमिटी अध्यक्ष रोहीत मोरे, सुरेश जरग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अश्वारूढ पुतळ्याचे स्वागत करण्यात आले.
यावेळी ‘जय भवानी - जय शिवाजी’ असा जयघोष करीत, हलगीच्या ठेक्यावर मंडळाचे तिरंगी तसेच भगवे झेंडे फडफडवीत दसरा चौकातून दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅली बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौकापासून उभा मारुती चौकापर्यंत काढण्यात आली.या दुचाकी रॅलीमध्ये आमदार जाधव यांच्यासह सुरेश जरग, प्रताप देसाई, तुळशीदास राऊत, सुनिल राऊत, प्रसाद इंगवले, लाला गायकवाड, चंद्रकांत यादव, केशवराव जाधव, सुरेश गायकवाड, श्रीकांत भोसले, कृष्णात चव्हाण, सदाशिव यादव, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी शाहीर कृष्णात पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे व शिवचरित्र यावर ऐतिहासिक पोवाडा सादर केला. या पोवाडा कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.