कोल्हापूर : महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत दि. २१ ते २९ सप्टेंबर अखेर नवरात्र उत्सवानिमीत्य भाविकांच्या सोईसाठी ‘श्री दुर्गादर्शन विशेष बससेवा’ सुरु करण्यात येत आहे. या विशेष बससेवेच्या आगावू आरक्षणाचा मंगळवारी येथील शाहू मैदान नियंत्रण पास विक्री केंद्रावर प्रारंभ करण्यात आला.
या दुर्गादर्शन विशेष सेवा प्रवासाचा कालावधी हा ४.४० तास इतका राहणार आहे. त्यासाठी प्रौढास ११० रुपये असा तिकीट दर राहील. लहान मुले व उभे राहून प्रवास करणाºया प्रवाशांसाठी ५५ रुपये अशा सवलतीच्या दरामध्ये तिकीट देण्यात येणार आहे. श्री शाहू मैदान नियंत्रण केंद्राच्या ८ कि.मी. परिक्षेत्रातील एकत्रित प्रवास करणाºया ३४ भाविकांसाठी ४२४० रुपये इतका दर ठेवण्यात आला आहे.
या विशेष बससेवेच्या तिकीट अगावू बुकींग सेवेचा प्रारंभ मंगळवारी सकाळी श्री शाहू मैदान पास विक्री केंद्रावर करण्यात आला. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यत अगावू आरक्षण सुरु राहणार आहे. अगाऊ आरक्षण पास धारकांना श्री दुर्गादर्शन प्रवाशांच्या दिवशी आरक्षणाच्या पासवर श्री शाहू मैदान येथे एक वेळ येणे व परत जाण्यासाठी मोफत प्रवास सवलत राहणार आहे.
देवींच्या दर्शनाचा लाभ
या विश्ोष बससेवेमध्ये श्री लक्ष्मीदेवी, श्री एकविरादेवी, श्री गजेंद्रलक्ष्मीदेवी, श्री मुक्तांबिकादेवी, श्री उजळंबादेवी, श्री पद्मावतीदेवी, श्री रेणूकादेवी, श्री त्र्यंबोलीदेवी, श्री फिरंगाईदेवी, श्री कमलजादेवी, श्री महाकालीदेवी, श्री अनुगामीनीदेवी, श्री तुळजाभवानी, श्री महालक्ष्मीदेवी, श्री कात्यायनीदेवी अशा देवींच्या दर्शनाचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.