गडहिंग्लज : कोविड समर्पित गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात इतर रुग्णांवरही उपचार सुरू करावेत, अशी मागणी गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गडहिंग्लज विभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांवरील उपचार बंद झाल्यामुळे गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड कागलसह सीमाभागातील गरीब रुग्णांची कुचंबणा होत आहे.
तथापि, सध्या गडहिंग्लज विभागातील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. त्यामुळे १० टक्के बेड कोरोनाबाधितांसाठी शिल्लक ठेवून उर्वरित बेड्स अन्य आजारांच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे, 'दानिविप'चे संस्थापक रमजान अत्तार, नगरसेवक हारुण सय्यद, भीमशक्तीचे परशराम कांबळे, रफिक पटेल, उदय परीट, आदींचा समावेश होता.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सिद्धार्थ बन्ने यांनी निवेदन दिले. यावेळी रमजान अत्तार, महेश सलवादे, उदय परीट, रफिक पटेल, हारुण सय्यद आदी उपस्थित होते. (किल्लेदार फोटो)
क्रमांक : २२०८२०२१-गड-१२