कोल्हापूर : कोरोना संसर्गाची गती पाहता रुग्णांवरील उपचाराकरिता कोल्हापुरात तातडीने दोन हजार खाटांचे जंबो कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी सोमवारी महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना निवेदनाद्वारे केली.
कोरोनासारख्या महामारीचे संकट अधिक गंभीर होत चालले आहे. भीतीपोटी प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा मिळावी, असे वाटू लागले आहे. अशा गंभीर व भीतीदायक वातावरणात रुग्णांची आर्थिक लुटमार करणारे काही महाठग कोल्हापुरात आहेत. म्हणूनच तातडीने शहरात दोन हजार खाटांचे जंबो कोविड सेंटर सुरू करावे, तसेच चोवीस तास एक वर्गीकरण कक्ष सुरू करावा, त्या कक्षाच्या माध्यमातूनच कोविड रुग्णांना त्यांच्यातील लक्षणानुसार रुग्णालयात दाखल करून घेण्याची व्यवस्था उभी करावी, असे पवार व देवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
शहरातील खासगी रुग्णालये शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना मिळवून देतात की नाही, याची पाहणी करावी तसेच जी रुग्णालये शासकिय योजनेचा लाभ मिळवून देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, कोविड रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचे दरपत्रक तसेच लॅबमधील तपासणीचे दरपत्रक संबंधित रुग्णांच्या दर्शनी भागात लावण्याची सक्ती करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड रुग्णालय, जिल्हा कोविड केअर रुग्णालये तातडीने सुरू करावीत, अशी मागणीही पवार यांनी केली.