कोल्हापूर : जलयुक्त शिवार या अभियानामध्ये २०१६-१७ या वर्षासाठी निवडलेल्या २० गावांमध्ये सात दिवसांत कामांना सुरुवात करण्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी संबंधित यंत्रणांना दिल्या. त्याचबरोबर या अभियानामध्ये गतवर्षी व यावर्षी समाविष्ट असणाऱ्या गावांमध्ये लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, जेणेकरून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होऊन पाणी साठविण्यास मदत होईल, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेऊन नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयास संबंधित विभागांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी सैनी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, वन विभागाचे उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक टी. पी. पाटील, आदी उपस्थित होते.या अभियानांतर्गत २०१५-१६ मध्ये अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मे पर्यंत शासनाने मुदतवाढ दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार दोन महिन्यांत बंधारे बांधणे, तलावातील गाळ काढणे व दुरुस्ती करणे, वन तलावांची देखभाल, टेकडावरून सलग समतल चर खणणे अशा स्वरूपाची कामे या सर्व विभागांनी पूर्ण करायची आहेत. जेणेकरून जूनपूर्वी ही कामे पूर्ण होतील व पावसाळ्यातील पाणी यामध्ये साचून त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर २०१६-१७ या वर्षासाठी या अभियानासाठी निवडलेल्या २० गावांमध्ये कामे सुरूकरण्यासंदर्भात येत्या सात दिवसांत नियोजन करून कामाला सुरुवात करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या. या गावांमध्ये प्राधान्यक्रम हा तलावातील गाळ काढण्यास दिला जाणार आहे. कारण दोन महिन्यांनंतर पावसाळा सुरू होणार असून, पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साठण्यास मदत होईल, या दृष्टीने हे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानातील कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील बैठक १३ एप्रिलला होणार आहे. या बैठकीला महसूल, जिल्हा परिषद, कृषी, जलसंधारण, जलसंपदा, सामाजिक वनीकरण, वन विभाग, आदी विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)अभियानात गावे वाढविण्यास शासनाला विनंतीशासनाकडून गतवर्षी या अभियानामध्ये जिल्ह्यातील ६९ गावांचा समावेश होता; परंतु या अभियानासाठी यावर्षी २०१६-१७ साठी फक्त २० गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांमधील काही गावे या अभियानामध्ये घेऊन गावांची संख्या वाढवावी, अशी विनंती शासनाला केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले. परंतु, तत्पूर्वी शासनाच्या टंचाई धोरणाच्या निकषामध्ये आपल्या जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे बसतात का, याचा अभ्यास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘जलयुक्त’मधील २० गावांत कामे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2016 12:13 AM