कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूरनियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून, पूरनियंत्रणासाठी एमआरडीपी प्रकल्पास तातडीने निधी उपलब्ध होऊन कामास सुरुवात होणे गरजेचे आहे. त्याकरिता तात्पुरते कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून निधी वितरणासाठी व प्रकल्प तातडीने सुरू करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या ‘मित्रा’च्या बैठकीत मान्यता दिली.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूरनियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याने पूरनियंत्रणासाठी एमआरडीपी प्रकल्पास तातडीने निधी उपलब्ध होऊन कामास सुरुवात होणे गरजेचे आहे. यासाठी वर्ल्ड बँकेकडून निधी प्राप्त होईपर्यंत कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे उपलब्ध असणाऱ्या निधीतून २५ टक्के निधी खर्च करण्यास मान्यता द्यावी व बँकेचा निधी प्राप्त होता सदरची रक्कम कृष्णा खोरे विकास महामंडळाला रेट्रो ॲक्टिव्ह फायनान्सिंगद्वारे परत करता येईल. त्यामुळे पूरनियंत्रणाचा एमआरडीपी प्रोजेक्ट तातडीने सुरू करणे शक्य होईल, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता देत प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक कामास तातडीने सुरू करण्याच्या सूचना केल्या.मित्रा संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक मुंबईत वर्षा निवासस्थानी पार पडली. बैठकीच्या सुरुवातीस मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियामक मंडळाच्या बैठकीत स्वागत केले. तसेच मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांना बैठकीचा अजेंडा स्पष्ट करण्याच्या सूचना केल्या. यानंतर कार्यकारी अधिकारी परदेशी यांनी मित्रा संस्थेमार्फत सुरू असणाऱ्या कामकाजाची थोडक्यात माहिती दिली तसेच मित्रा संस्थेमार्फत सद्य:स्थितीत सुरू असणारे प्रकल्प एमआरडीपी, कृषी, माहिती तंत्रज्ञान आदीबाबत माहिती दिली.
कोल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्पाची कामे तातडीने सुरु करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 1:09 PM