कोल्हापूर : अवैज्ञानिक मागास विचारांचा प्रसार करून, धर्माधर्मांत तेढ निर्माण करून जातिव्यवस्था बळकट करण्याचे काम सध्या सुरू आहे. समाजाला आधुनिकपूर्व काळाकडे मागे खेचण्याचे कटकारस्थान यशस्वी होऊ नये म्हणून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने जागृत होण्याची वेळ आली आहे. यासाठी एकत्र येऊन या धर्मांध शक्तींविरोधात लढा देण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन कर्नाटकातील ज्येष्ठ विचारंवत के. एस. भगवान यांनी केले. शाहू स्मारक भवन येथे डेमोक्रॅटिक यूथ फेडरशेन आॅफ इंडिया (डीवायएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीतर्फे आयोजित युवा संघर्ष संदेश जथ्थ्याच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते शरद भुताडिया होते. भगवान म्हणाले, गौतम बुद्धांचा इतिहास पाहिला असता त्यांनी सर्वप्रथम वर्ण व जातिव्यवस्था नाकारली. बुद्धांची राजवट होती तेव्हा कधीच परकियांचे आक्रमण झाले नव्हते; परंतु जेव्हा जातिव्यवस्था निर्माण झाली तेव्हा २६ वेळेला परकियांनी आपल्यावर आक्रमणे केली. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही जातिव्यवस्था कमी करण्यासाठी काम केले. पुढे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांनी इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांचा सामना करून खरा इतिहास समाजापुढे आणला. ज्यांना जात, धर्म, लिंग यांत समान अधिकार असलेले आधुनिक राष्ट्र म्हणून आपला समाज पुढे जाणे पटत नाही, त्यांनीच यांची हत्या केली. मात्र, या धर्मांध शक्तींच्या दहशतवादासमोर महाराष्ट्रातील युवा पिढी झुकणार नाही. जातीनिहाय धर्मनिरपेक्ष देश करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. भगवान यांचे संपूर्ण भाषण इंग्रजीमध्ये झाले. यावेळी उदय नारकर यांनी त्याचे भाषांतर करून सांगितले. याप्रसंगी कोल्हापूरचे अध्यक्ष शिवाजी मगदूम यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष अजय बुरांडे, राज्य सेक्रेटरी प्रीती शेखर, राज्य सेक्रेटरी प्रशांत मायकेल, जिल्हा सेक्रेटरी शिवाजी बंदारे, दिलीप पोवार, चंद्रकांत यादव, शिवाजी शिंदे, दत्ता चव्हाण, कृष्णात कुलकर्णी, शिवाजी बोंद्रे, सदा मलाबादे, नितीन निपाणी, गणेश पुरवाते, आदी उपस्थित होते. रविवारी सकाळी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ येथून शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जथ्थ्याची सुरुवात झाली. पुढे गंगाराम कांबळे स्मृतिस्तंभास अभिवादन करून शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवाजी पुतळा, जुना राजवाडा, बिंदू चौक, उमा टॉकीज, गोखले कॉलेज, यादवनगर, शास्त्रीनगर या मार्गावरून जथ्था गोविंद पानसरे यांची ज्या ठिकाणी हत्या झाली तेथे येऊन पानसरे यांना अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी रघू कांबळे, अनिल चव्हाण, एस. बी. पाटील यांनी जथ्थ्याचे स्वागत केले. याप्रसंगी उमा पानसरे, मेघा पानसरे, सुभाष वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे हा जथ्था राजारामपुरी मारुती मंदिर, जनता बझार, उमा टॉकीज या मार्गे, शाहू स्मारक भवन येथे जथ्था आला. या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सायंकाळी जथ्था इचलकरंजीकडे रवाना झाला. पुढे पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, जळगाव, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांत जथ्था फिरून ९ आॅक्टोबरला औरंगाबाद येथे होणाऱ्या अधिवेशनामध्ये कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)जथ्था रवानाडॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे तसेच प्रा. कलबुर्गी यांच्या तेजस्वी हौतात्म्याचा हाच संदेश घेऊन डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन आॅफ इंडिया दोन युवा संघर्ष जथ्थे रविवारी काढण्यात आली. पुण्यामध्ये डॉ. दाभोलकर यांना ज्या ठिकाणाहून आणि कोल्हापुरामध्ये पानसरे यांच्यावर ज्या ठिकाणी गोळ्या घालून जीवघेणा हल्ला झाला त्या ठिकाणाहून हा जथ्था काढण्यात आला.
युवा संघर्ष संदेश जथ्थ्यास प्रारंभ
By admin | Published: October 04, 2015 11:23 PM