कोल्हापूर : ‘पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन’ म्हणून भीमा कृषी प्रदर्शन ओळखले जाते. यंदा हे प्रदर्शन उद्या (दि. ३० ते २ फेबु्रवारीअखेर) मेरी वेदर मैदान येथे आयोजित केले आहे. दरवर्षीप्रमाणेच विविध पशू आणि पक्ष्यांचे प्रदर्शन, मत्स्य व अश्व प्रदर्शन, तांदूळ महोत्सव हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या, शुक्रवारी दुपारी तीन वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार महादेवराव महाडिक आहेत. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी राजाराम माने, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील, केडीसीसी बँक प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक मोहन आटोळे, बसवराज मास्तोळी, रिलायन्स पॉलिमर्सचे सत्यजित भोसले, महालक्ष्मी इंडस्ट्रीजचे प्रशांत पारडे, महालक्ष्मी इस्पातचे जितूभाई गांधी, आदी उपस्थित राहणार आहेत.यावेळी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी महिला, संशोधक, तंत्रज्ञांना विविध पुरस्कार दिले जाणार आहेत, तर शेतीसाठी जीवन समर्पित केलेल्या व्यक्तीला भीमा कृषी जीवनगौरव पुरस्कार देणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. या प्रदर्शनात देश-परदेशांतील कृषीविषयक कंपन्या, नवतंत्रज्ञान, शेती उत्पादने, शेतीसाठी उपयुक्त चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित केली जाणार आहेत. याशिवाय एक हजार वैशिष्ट्यपूर्ण जनावरे (गाय, म्हैस, बैल, वराह, कोंबडी, इमू) यांचा समावेश करण्यात आला आहे. पक्षी प्रदर्शन, फ्लॉवर शो, मत्स्य प्रदर्शन व अश्व प्रदर्शन ही वैशिष्ट्ये ठरणार आहेत. प्रदर्शनात ४०० स्टॉल उभारण्यात आले असून यातील २०० स्टॉल महिला बचत गटांना देण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या चार दिवसांत सांस्कृतिक कार्यक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र होणार आहेत.
भीमा कृषी प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ
By admin | Published: January 29, 2015 11:46 PM