आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ३0 : मध्यरात्री बारापासून संपुर्ण देशात लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) प्रणालीमुळे महागाई कमी होईल की, वाढेल याबाबत नागरीकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याने नागरीकांनी शनिवारपासून या कराची अंमलबजावणी होण्याअगोदर सोन्या, चांदीबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, वाहने खरेदीसाठी शुक्रवारी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक वेळी मुहुर्त बघून खरेदी करणाऱ्या भारतीयांनी शुक्रवारी मात्र, खरेदीचा मुहुर्त न बघता विविध वस्तु, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु खरेदी केली. देशात एकच प्रकारची करप्रणाली लागू करण्यासाठी ‘जीएसटी ’ ही करप्रणाली केंद्र शासनाने लागू केली आहे. दिल्ली संसदेमध्ये विशेष अधिवेशनानंतर देशभरात हा कर लागू होणार आहे. या करामुळे देशात उत्पादित होणाऱ्या विविध वस्तूंच्या किमतीत बदल होणार आहेत. काही वस्तू महागणार आहेत, तर काही स्वस्त होणार आहेत. त्यामुळे वस्तू महाग होण्यापूर्वीच म्हणजे जीएसटी लागण्याच्या आधी ग्राहकवर्गाकडून वस्तू खरेदी केल्या जात आहेत. शहरातील बाजारपेठेत शुक्रवारी तर वस्तू खरेदीसाठी रीघ लागली. जुन्या करपद्धतीचा अखेरचा दिवस असल्याने शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीची झुंबड उडाली . त्यासाठी व्यावसायिकही सकाळी लवकर दुकाने थाटली होती. विशेषत: सराफी व्यावसायिक, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, दुचाकी.चारचाकी शोरुम्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होती. यात विशेष बाब म्हणून जीएसटी लागू होण्यापुर्वीची किंमत व जीएसटी लागू झाल्यानंतरची किंमत यातील फरक दाखववून अनेकांनी ग्राहकांना सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु खरेदीसाठी उद्युक्त केले. शुक्रवारी मध्यरात्री पासून जीएसटी लागू होणार असल्याने विक्रीकर भवन चे वस्तु आणि सेवाकर भवन असे नामकरण करण्यात आले असून तसा फलकही शुक्रवारी सकाळी रंगवून घेण्यात आला. यासह जीएसटी भवन येथे शनिवारी सकाळी अकरा वाजता नामफलकाचे अनावरण होणार आहे. तर उपस्थित व्यापारी, उद्योजकांसाठी शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विभागाचे प्रा.एम.एस.देशमुख यांचे जीएसटी संदर्भात व्याख्यान होणार आहे.
वाहन खरेदी वेगवान
जीएसटी ची अंमलबजावणी शनिवारपासून होत आहे. यात दुचाकीची खरेदी नियमितपणे झाली. तर चारचाकीमध्ये जीएसटी लागू होण्यापुर्वी किंमतीमध्ये विशेष सवलत दिल्याने अनेकांनी चारचाकी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. गेल्या आठवडाभरात जीएसटी लागू झाल्यानंतर किंमती वाढणार असे गृहीत धरुन दुचाकीसह चारचाकी गाडयांची खरेदी केली. त्यामुळे गेल्या पाच दिवसांमध्ये नवीन वाहन नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात नेहमीपेक्षा गर्दी अधिक होती. तर शुक्रवारी सायंकाळपर्यंत अनेकांनी यापुर्वी खरेदी केलेल्या वाहनांच्या नोंदणीसाठी गर्दी केली होती.
सहा महीन्यातून एकदा रिटर्न भरुन घ्या
किरकोळ व घाऊक धान्य व्यापाऱ्यांना प्रत्येक महिन्याला रिटर्न भरुन देणे शक्य नाही. त्यामुळे जीएसटी विभागाने ती सहा महिन्यातून एकदा भरुन घ्यावी. त्याचप्रमाणे अन्नधान्यावरील शून्य टक्के जीएसटी लागू करावी. - वैभव सावर्डेकर, माजी अध्यक्ष, कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशन,
रिटर्न भरण्यासाठी मुदत वाढ
व्यापारी , व्यावसायिक, उद्योजक आदींना जीएसटी चे रिटर्न भरण्यासाठी जुलै व आॅगस्टमध्ये मुदतवाढ दिली जाणार आहे. यात जुलै महीन्याची रिटर्न २० आॅगस्ट २०१७, तर आॅगस्ट ची रिटर्न २० सप्टेंबर २०१७ पर्यंत भरण्याची मुभा दिली आहे. यासाठी एक पानाचा आर ३ बी हा एक पानाचा अर्जही उपलब्ध केला आहे. त्यामुळे करदात्यांनी त्याप्रमाणे भरुन सहकार्य करावे. असे आवाहन जीएसटी विभागाचे उपायुक्त सचिन जोशी यांनी केले आहे.