कोल्हापूर : येथील राजाराम महाविद्यालय आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘राजाराम महोत्सवा’स आज, गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. महाविद्यालयाच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शनिवार (दि. ५) पर्यंत रंगणाऱ्या या महोत्सवाची महाविद्यालय प्रशासन व माजी विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी केली आहे.
राजाराम महाविद्यालयासमोर भव्य स्वागत कमान उभारली आहे. सायबर - शिवाजी विद्यापीठ मार्गावरील स्वागत कमानीपासून ते महाविद्यालय परिसर, यशवंतराव चव्हाण सभागृहात आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. सेल्फीप्रेमींसाठी सेल्फी पॉंइंट उभारण्यात आला आहे. यासह याच परिसरात खाद्यांचे स्टॉलही उभारण्यात आले आहेत.
गुरुवारी सकाळी दहा वाजता शाहू छत्रपती यांच्या हस्ते महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त राजाराम महाविद्यालयाचा इतिहास सांगणारा माहितीपट दाखविण्यात येणार आहे. यासह इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे ‘राजाराम महाविद्यालयाचा इतिहास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर रांगोळी स्पर्धा, सॅलेड डेकोरेशन, फेस पेंटिंग स्पर्धा, तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्वांना लाभ घेता यावा, म्हणून सभागृहाबाहेर स्क्रीन उभारण्यात आले आहेत. या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी माजी विद्यार्थ्यांसह सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य ए. एस. खेमनार यांनी केले आहे.
पाच हजार विद्यार्थ्यांचे नियोजनमहोत्सवानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात स्वागत कमान उभी केली आहे. महाविद्यालयाच्या जुन्या आठवणी जपण्यासाठी सेल्फी पॉइंटही उभारण्यात आला आहे. तीन दिवस चालणाºया महोत्सवात किमान पाच हजार माजी विद्यार्थी भेट देणार असल्याने त्या पद्धतीने आम्ही नियोजन केले आहे.- शशिकांत पाटील, माजी जी. एस.