कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आठव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. ८१ प्रभागांत १ नोव्हेंबरला निवडणूक होणार असून, सात क्षेत्रीय कार्यालयांत कामकाज सुरू झाले आहे. तसेच नेमणूक केलेले संबंधित पूर्णवेळ अधिकारी या कार्यालयांत उपस्थित राहणार आहेत. प्रभागवार उमेदवारांना नेमून दिलेल्या क्षेत्रीय कार्यालयांत उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. याशिवाय उमेदवारांना संगणक प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा प्रशासनाने करून दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १३ आॅक्टोबरपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानंतर १४ आॅक्टोबरला अर्ज छाननी, तर १९ आॅक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. दरम्यान, या निवडणुकीत सुमारे साडेचार लाख मतदार निश्चित करण्यात आले आहेत. निवडणूक तोंडावर आली असतानाही प्रशासनातील कामकाजात एकसूत्रीपणा नसल्याने याद्यांचा घोळ अद्याप कायम आहे. सातही क्षेत्रीय कार्यालयांत एक निवडणूक निर्णय अधिकारी, एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, दोन सहायक निवडणूक अधिकारी, तीन सहायक निवडणूक अधिकारी, असा अधिकाऱ्यांचा फौजफाटा राहणार आहे.महापालिकेवर आपला पक्ष-आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजप-ताराराणी महायुती, राष्ट्रवादी-जनसुराज्य महाआघाडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना यांनी जोरदार तयारी केली आहे. यामध्ये भाजप-ताराराणी महायुतीने आतापर्यंत ६२ उमेदवार निश्चित करून आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी-जनसुराज्य महाआघाडीने ५५, काँग्रेसने १८, तर शिवसेनेने ५८ जणांची उमेदवारी जाहीर केली आहे.जातीच्या दाखल्याबाबत आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ते नसल्यास जात पडताळणी समितीकडे पडताळणीकरिता सादर केलेल्या अर्जाची सत्य प्रत किंवा अन्य कोणताही पुरावा सादर करावा लागणार आहे व निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. उमेदवारांचे जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र तपासणीसाठी मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई गार्डन येथे समाजकल्याण कार्यालयाचे विशेष अधिकारी (गट ब) विशाल लोंढे व अधीक्षक पी. के. गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याप्रमाणे राखीव प्रभागांतील इच्छुक उमेदवारांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी या कार्यालयाकडे सादर करण्याचेही आवाहन केले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात
By admin | Published: October 05, 2015 12:24 AM