लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : प्रतिचेरापुंजी असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अतिवृष्टीचा पाऊस होतो. मात्र, त्याची शासनस्तरावर कोणतीही दखल घेतली जात नव्हती. किटवडे परिसरातील शेतकऱ्यांची या भागातील पावसाची अचूक नोंद होऊन शेती व घरांच्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी होती. आमदार प्रकाश आबीटकर यांच्या प्रयत्नातून किटवडे येथे नुकतेच अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्र बसवले आहे.
अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळण्यासंदर्भातील मार्ग यामुळेे मोकळा झाला आहे. दरवर्षी किटवडे परिसरात जून ते सप्टेंबर महिन्यात दररोज अतिवृष्टीचा पाऊस पडतो. मात्र, राज्य शासनाच्या कृषी विभागाचे पर्जन्यमापक यंत्र नसल्यामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या.
भात, ऊस, भुईमूग ही पिके अतिवृष्टीने कुजून जात होती. दररोज पडणारा २०० मि. मी. पाऊस व समुद्रावरून आलेले पावसाचे ढग थेट किटवडे परिसरातच कोसळत असल्याने आजही अतिवृष्टी सुरूच आहे.
चार महिने येथील ग्रामस्थांना सूर्यदर्शनही होत नाही तर ओढे, नाले व नदीला पूर आल्यामुळे येथील नागरिकांचा आजऱ्याशी अनेकदा संपर्क तुटतो. त्यामुळे येथील ग्रामस्थांना मे महिन्यातच दिवाळीपर्यंतचा बाजार खरेदी करावा लागतो.
...प्रतिदिन पावसाची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर
किटवडे येथे उभारलेले अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्र जलविज्ञान प्रकल्प विभागाच्यावतीने सुरू केले आहे. हिरण्यकेशी नदीच्या पाणलोट क्षेत्रात असणारे हे एकमेव पर्जन्यमापक यंत्र आहे. १५५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील पावसाची या केंद्रामध्ये नोंद होणार आहे. तसेच नदीतील पुराचा अंदाज घेणे व टीआरएस डेटामुक्त पाणलोटातून स्त्राव मोजण्यासाठीही उपयोग होणार आहे. या पर्जन्यमापक यंत्रावर होणारी पावसाची नोंद स्टेट डाटा सेंटरमध्ये होणार आहे. प्रतिदिन पावसाची माहिती ्रल्ल्िरं६१्र२.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणार
किटवडे परिसरात चेरापुंजीपेक्षाही जास्त पाऊस पडतो. या परिसरात ऊस, भात, भुईमूग यासारखी पिके घेतली जातात. नव्याने सुरू केलेल्या अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्रात अतिवृष्टीची नोंद होणार आहे. या पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास यापुढे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
फोटो ओळी : किटवडे (ता. आजरा) येथे राज्य शासनाच्या जल विभागातर्फे अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे.
क्रमांक : १४०७२०२१-गड-०२