कोल्हापूर : बचतगट स्थापन करण्यामागे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र बनविणे हा मुख्य हेतू आहे. कोल्हापुरातील बचतगटांचे काम पाहिले, तर उद्देश सफल झाला आहे. कोल्हापूरचे काम राज्याला आदर्शवत व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार स्टेट बँक आॅफ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रवीणकुमार गुप्ता यांनी काढले. बचतगटांनी आता नुसते उत्पादनच करून थांबू नये, त्याचे मार्केटिंग व्हावे, यासाठी स्टेट बँक आॅफ इंडिया सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.स्टेट बँक इंडिया क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यातर्फे शुक्रवारी केशवराव भोसले नाट्यगृहात बचतगट महामेळाव्याचे आयोजन केले होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील १0 उत्कृष्ट बचतगटांना गौरविण्यात आले.
महामेळाव्यात बचतगटांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरविल्यानंतर पुरस्कार्थीसमवेत मॅनेजिंग डायेक्टर प्रवीणकुमार गुप्ता, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जनरल मॅनेजर संजयकुमार, डीआरडीए प्रभारी प्रकल्प संचालक सुषमा देसाई, क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप देव, उपमहाप्रबंधक आबीबूर रहमान, नाबार्डचे साहाय्यक महाप्रबंधक नंदकुमार नाईक, अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने, आदी उपस्थित होते.
कोल्हापूरची श्रीमंती आणि कष्टाळूपणा पाहून भारावून गेल्याचे सांगताना प्रवीणकुमार गुप्ता यांनी ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभलेल्या कोल्हापुरात महिलांची बचतगटातून झालेली प्रगतीही वाखाणण्याजोगी असल्याचे नमूद केले. आर्थिक सक्षमतेसाठी महिलांनी या चळवळीत सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही गुप्ता यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, बचतगटांमुळेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचा राज्यात गौरव झाला आहे, आता देशात होण्यासाठी महिलांनी अधिक सक्रियपणे काम करावे. बॅ्रडिंगला महत्त्व असल्याने बचतगटांनी याकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहनही मित्तल यांनी केले. यावेळी सुनीता पाटील (कुटवाड), उज्ज्वला जाधव (आरग) यांनी मनोगत व्यक्त करताना बचतगटाच्या माध्यमातून झालेली प्रगती कथन केली.जनरल मॅनेजर संजयकुमार, क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप देव, उपमहाप्रबंधक आबीबूर रहमान, नाबार्डचे साहाय्यक महाप्रबंधक नंदकुमार नाईक, अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने, डीआरडी प्रभारी प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांची उपस्थिती होती.
गौरविण्यात आलेले बचतगटधनलक्ष्मी बचतगट (कुटवाड), रेणुका बचतगट (हिटणी), आरग बचतगट (आरग), प्रगती बचतगट (कसबा सांगाव), स्वागत बचतगट (कसबा सांगाव), आदर्श बचतगट (कसबा सांगाव), साक्षी बचतगट (कसबा सांगाव), स्वामिनी बचतगट (उजळाईवाडी), सिद्धिविनायक बचतगट (जठारवाडी).