आजरा : भादवण (ता. आजरा) येथे दुर्मीळ असणारा व महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी असलेला (शेकरू उडती) खार आढळून आला आहे. दिवसभर खाद्य मिळाले नसल्याने तो सायंकाळी अशक्त झाला होता. सायंकाळी पुन्हा मराठी शाळेजवळील नारळाच्या झाडाच्या टोकावर बसलेला नागरिकांनी त्याला पाहिले. सोमवारी सकाळी शैलेश मुळीक यांच्या घराच्या पाठीमागील जागेत शेकरू उड्या मारत असल्याचे आढळून आले.
कुतूहलाने मुळीक यांनी त्याचे फोटोही घेतले. थोड्यावेळाने तो झाडावर सहज उडी मारून गेला. त्यानंतर दिवसभर तो बांबूच्या बेटात व नारळाच्या झाडावर उड्या मारत असताना नागरिकांनी त्याला पाहिले. दुपारच्या उन्हाच्या तीव्रतेचा वेळी कावळ्यांनी शेकरूला चोच मारून त्रास देण्याचाही प्रयत्न केला. सुभाष सुतार, शैलेश मुळीक या प्राणीमित्रांनी कावळ्याच्या त्रासातून शेकरूची सुटका केली. कावळ्यांचा त्रास व दिवसभर खाद्य न मिळाल्याने सायंकाळी तो अशक्त झाल्याचा दिसत होता.
शेकरू दिसायला गोंडस व आकर्षक असून, तांबूस रंगाची झुपकेदार शेपूट आहे. शेकरू सोमवारी दिवसभर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज १५ ते २० फुटांची लांब झेप घेत होता. लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी आणि गळ्यावर व पोटावर पिवळसर पट्टा असणारा शेकरू हा भादवणमध्ये आढळून आला आहे. दुपारी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी शेकरूला पकडण्यासाठी आले.
मात्र, त्यावेळी शेकरू बांबूच्या बेटात आत जाऊन लपून बसला होता. तो बराच वेळ बाहेर आलाच नाही. मात्र सायंकाळी तो पुन्हा नारळाच्या झाडावर उंच टोकावर आढळून आला.
शेकरूचा अधिवास आंबोलीच्या जंगलात.... शेकरू हा दाट जंगलात व नारळ, माड, उंबर या झाडांवर हमखास आढळतो. त्याचा नैसर्गिक अधिवास आजऱ्यापासून जवळच असलेल्या आंबोलीच्या जंगलात आहे. मात्र, अचानक तो भादवण गावात दिसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी तो आर्दाळ गावात आढळून आला होता.
खाद्य नसल्यामुळे मानवी वस्तीकडे..... शेकरूचा नैसर्गिक आधिवास जंगलतोडीमुळे संपुष्टात आला आहे, तर दाट जंगलातील त्याचे खाद्य कमी झाल्यामुळे तो मानवी वस्तीकडे येत आहे. तो थोडासा लाजरा व उंच झाडावर वास्तव्य करून राहत असल्याने त्याचा कोणालाही त्रास होत नाही असे आजरा महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विनायक आजगेकर यांनी सांगितले.
फोटोकॅप्शन - भादवण ( ता. आजरा ) येथे आढळलेला शेकरू.