कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विसाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीला गुरुवारी येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात चिमुकल्यांच्या गजबजाटात, सळसळत्या उत्साहात प्रारंभ झाला. मलग हायस्कूलच्या 'भगीरथ जगाचा' या बालनाट्याने या स्पर्धेचा पडदा उघडला.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे व्यवस्थापक समीर महाबरी आणि वरिष्ठ लिपिक उदय माने यांनी गुरुवारी सकाळी नटराज पूजन केले. रंगकर्मी सुनील घोरपडे यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती आणि परीक्षक अंजली धारू (पुणे), राजेश दुर्गे (नांदेड), आणि सचिन चौघुले, (जळगाव) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. रंगदेवतेची पूजा करून स्पर्धेला प्रारंभ झाला.
पहिल्याच दिवशी शहरातील मलग हायस्कूलसह आजरा येथील आजरा हायस्कूल यांचे झाडवाली झुंबी, अण्णाभाऊ इंग्लिश स्कूल यांचे 'शपथ', पंडित दीनदयाळ विद्यालय यांचे 'सिकंदर' आणि श्री रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर यांचे 'पंखाविना पाखरू' ही आजरा तालुक्यातील तब्बल चार शाळेतील इतर बालनाटकेही बाल रसिक प्रेक्षकांच्या हाउसफुल्ल उपस्थितीत सादर झाली. या स्पर्धेत ११ जानेवारी पर्यंत ८ दिवसात एकूण ३० बाल नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत, तसेच ४०० हून अधिक बालकलाकार या रंगमंचावर आपली कला सादर करणार असल्याची माहिती स्पर्धा समन्वयक प्रशांत जोशी यांनी दिली.