कोल्हापूर : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत रविवारी राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा कोल्हापुरात रंगला. तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या स्पर्धेत विविध गटांत ‘सोयरे सकळे’, ‘अव्याहत’, ‘सवेरेवाली गाडी’, ‘संगीत संत गोरा कुंभार’, ‘वज्रवृक्ष’, ‘झेप’, ‘काऊमाऊ’ या प्रथम क्रमांक मिळविलेल्या नाटकांसह इतर विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
केशवराव भोसले नाट्यगृहात पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते अरुण नलावडे, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक मीनल जोगळेकर, पुणे विभागाच्या उपसंचालक सुनीता अस्वले, शिंदे थिएटर अकॅडमीचे सुनील शिंदे, आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात तीन तासांंहून अधिक काळ हा सोहळा रंगला. या निमित्ताने ‘मराठी नाटकांची एकशे पंचाहत्तरी’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून मराठी रंगभूमीचा प्रवास उलगडण्यात आला. विविध नाट्यप्रसंगासह गीत, नृत्याच्या सुरेख मिलाफातून १८८३ ते २०१८ या एकशे पंचाहत्तर वर्षांतील मराठी नाटकांचा हा सारा प्रवास सर्वांनाच आवडला. याचे दिग्दर्शन व संकल्पना सुनील देवळेकर यांची होती, तर यामध्ये कलाकार अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, प्रणव रावराणे, प्रभाकर मोरे, संतोष पवार, पोर्णिमा अहिरे-केंडे, विक्रांत आजगावकर, संदीप कांबळे, अभिषेक मराठे, प्रेरणा निगडीकर, संतोष काणेकर, केदार परूळेकर, सचिन गजमल, शुभांगिनी पाटील, आदींचा कलाविष्कार होता.
कोल्हापूर, सांगलीच्या कलाकारांचा सन्मानया पारितोषिक वितरण सोहळ्यात कोल्हापूर व सांगलीतील गुणवंतांचाही सन्मान झाला. यामध्ये अभिनय गुणवत्तेसाठी सानिका आपटे, संकेत देशपांडे, सुरभी कुलकर्णी (जीवनक्रांती बहुउद्देशीय शेतकरी मंडळ, कोल्हापूर), उत्कृष्ट अभिनयासाठी सत्यजित साळोखे (परिवर्तन कला फौंडेशन, कोल्हापूर), अभिनय गुणवत्तेसाठी अथर्व काळे (श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली), शिवराज नाळे (हेल्पिंग बडीज फौंडेशन, सांगली), गायन गुणवत्तेसाठी श्रद्धा जोशी (देवल स्मारक मंदिर, सांगली), उत्कृष्ट अभिनयासाठी गंधार खरे(सस्नेह कला क्रीडा मंडळ, सांगली) आदींसह विजेत्यांचा गौरव करण्यात आला.