आजरा : आजरा येथील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक कै. रमेश टोपले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवनाट्य मंडळ आजरा यांच्यावतीने ८ ते १४ जानेवारीअखेर दुसऱ्या राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष शंकर टोपले व कार्यवाह आय. के. पाटील यांनी दिली.या नाट्यमहोत्सवामध्ये पुढील नाट्य प्रयोगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. ८) ‘आनंदडोड’ सादरकर्ते राजयोग, पुणे. शनिवारी (दि. ९) ‘संगीत ययाती आणि देवयानी’ सादरकर्ते अॅक्टिव्ह गु्रप सांगली. रविवारी (दि १०) ‘विच्छा माझी पुरी करा’ सादरकर्ते सुगुण कोल्हापूर. सोमवारी (दि. ११) ‘याच दिवशी याच वेळी’ सादरकर्ते सिद्धांत कुडाळ, मंगळवारी (दि. १२) ‘साखर खाल्लेला माणूस’, चिन्मय कोल्हापूर. बुधवारी ( दि. १३) ‘अजून यौवनात मी’, सादरकर्ते पी. आय. कमिटी, पुणे, गुरुवारी (दि. १४) ‘सारे प्रवासी घडीचे’ सादरकर्ते बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ.सादर होणाऱ्या सात नाटकांतून प्रेक्षकांच्या पसंदीने काढण्यात येणाऱ्या प्रथम तीन क्रमांकांच्या नाटकांना रसिक पसंदी मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट तीन दिग्दर्शकांना रोख ३००१, २००१, १००१ मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनयाकरिता तीन पारितोषिके असून ३००१, २००१, १००१ मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.१५) सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. यावेळी ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रम होणार आहे, असेही टोपले व पाटील यांनी स्पष्ट केले.यावेळी डॉ. श्रद्धानंद ठाकूर, प्रा. सुधीर मुंज, मंदार बापट, राकेश करमळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आजऱ्यात राज्य नाट्यमहोत्सव
By admin | Published: December 30, 2015 9:40 PM