कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांच्या संयुक्त पथकाने आज हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथील अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा घातला मोठ्या प्रमाणात हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर, पत्र्याचे 40 डबे मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
11 हजार 350 लिटर कच्चे रसायन एकूण 2 लाख 75 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. या कारवाईवेळी पथकातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात शोध मोहिम राबवली असता आसपास 75 लोखंडी बॅरेल, सिंटेक्स टाक्या, पत्र्याचे डबे यामध्ये रसायनाचा साठा केलेला आढळला. या कारवाईत एकूण 9 गुन्हे नोंदविण्यात आले, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.कोराना विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क, विभागाकडून जिल्ह्यांतील विविध ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीच्या ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. अशा प्रकारे आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या हातभट्टी दारू अथवा बाजारात अवैध मार्गाने उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही प्रकाराच्या देशी, विदेशी तसेच बनावट अथवा परराज्यातील अवैध मद्य सेवन करू नये, असे आवाहन अधीक्षक पाटील यांनी केले आहे. अशा प्रकारे मद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीकडे मद्य प्राशन करण्यासाठी विविध ठिकाणाहून लोक येण्याची शक्यता असल्याने, अशा लोकांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या कारवाईत अधीक्षक व उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर, निरीक्षक भरारी पथक, हातकणंगले, शाहुवाडी, कागल, कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, इचलकरंजी व पोलीस विभागाकडील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच पोलीस उपअधीक्षक जयसिंगपूर व हातकणंगले पोलीस अशा 60 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.