बुबनाळ : वारंवार उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीचा अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करणे गरजेचे आहे. राज्य शासनाकडून याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल. नुकसानीच्या पंचनाम्याचे विभाग व कृषी विभागाकडून लवकरच सुरुवात होईल. नुकसानग्रस्त पूरबाधित नागरिक नुकसानभरपाईपासून वंचित राहिला नाही पाहिजे, यासाठी पारदर्शकपणे पंचनामे करावेत, अशा सूचना आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, घाबरून जाऊ नका राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिली.
शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील गणेशवाडी, शेडशाळ, कवठेगुलंद, गौरवाड, औरवाड, बुबनाळ या गावांना भेटी देऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, मागील पाच- सहा दिवसांपासून राज्यमंत्री यड्रावकर शिरोळ तालुक्यातील पूरबाधित गावांना भेटी देत त्या गावातील नागरिकांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. प्रशासनाला सर्व व संबंधितांना मदत करण्यासंबंधीचे आदेश व सूचना देत आहेत.
कोणत्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त पूरबाधित नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही शेवटी राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले.