कोल्हापूर : राज्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र राज्यात अजूनही काही ठिकाणी अतिवृष्टी हाेत असून तेथील पंचनामे व्हायचे आहेत. त्यामुळे मदतीसाठी थोडा विलंब होत असला तरी मदतीस राज्य शासन कटिबद्ध असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकातून दिली.
यंदा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. शहरी भागातील नागरिकांनाही नुकसानीला तोंड द्यावे लागले. या सर्वांना नुकसानभरपाई देऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसानंतर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत. कोणी नुकसानभरपाई पासून वंचित राहू नये, अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.
त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यांचेसुद्धा पंचनामे होऊन मदत मिळणे गरजेचे आहे.
या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार होऊन योग्य शासन निर्णय काढण्यासाठी आघाडी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.