कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, आरक्षण मिळेपर्यंत ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला सोयी-सवलती द्याव्यात व त्यासाठी राज्य सरकारने तातडीने दोनदिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. त्यामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरोनामुळे संयम, शांततेमध्ये आंदोलन सुरू आहे. ते टप्प्याटप्याने आक्रमक केले जाईल, असा इशारा मराठा समाजाने सरकारला दिला. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही केला.
येथील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी साडेनऊ वाजता धरणे आंदोलन सुरू झाले. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. त्यांनी आरक्षणासह अन्य मागण्यांचे फलक घेऊन दीड तास ठिय्या मारला. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. या आंदोलनात निवासराव साळोखे, महेश जाधव, दिलीप देसाई, सत्यजीत कदम, सुनील कदम, विजय सूर्यवंशी, सचिन चव्हाण, बाबा पार्टे, दिलीप सावंत, किसन भोसले, दिलीप पाटील, सचिन तोडकर, राजू सावंत, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे, विजय जाधव, आशिष ढवळे, संपतराव पाटील, सुरेश जरग, गायत्री राऊत, विक्रम जरग, विजय माने, आदी सहभागी झाले होते.
चौकट
आरक्षणाच्या लढ्याला पाठबळ द्या
मराठा आरक्षणाचा लढा आता पुन्हा सुरू झाला आहे. त्याला सर्वांनी पाठबळ द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा निर्धार सकल मराठा समाजाने केला आहे. दोन दिवसात पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे समन्वयक सुजित चव्हाण यांनी सांगितले.