लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, आरक्षण मिळेपर्यंत ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला सोयी-सवलती द्याव्यात व त्यासाठी राज्य सरकारने तातडीने दोनदिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. त्यामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरोनामुळे संयम, शांततेमध्ये आंदोलन सुरू आहे. ते टप्प्याटप्याने आक्रमक केले जाईल, असा इशारा मराठा समाजाने सरकारला दिला. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही केला.
येथील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी साडेनऊ वाजता धरणे आंदोलन सुरू झाले. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. त्यांनी आरक्षणासह अन्य मागण्यांचे फलक घेऊन दीड तास ठिय्या मारला. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
---------------------------------------------------------------------
गेल्या साठ वर्षांत मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : गेल्या साठ वर्षांत राज्य आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही. मग, त्यावेळी झोपा काढत होता काय? शरद पवार यांनी मराठा समाजाचा मंडल आयोगामध्ये का समावेश केला नाही, अशी विचारणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.
कसली वाट पाहत आहात?
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे की नाही, मागासवर्गीय आयोगाची स्थापना, पुनर्विचार याचिका दाखल करणे, आरक्षणानुसार नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी सेवेत रूजू करून घेण्याबाबत कसली, कोणती वाट पाहत आहात, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. मी अनेक खाती सांभाळली आहेत. त्यामुळे निर्णय घ्यायला किती वेळ लागतो हे मला माहीत आहे. कोरोना आणि मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घेण्याची सरकारची हिंमत नसल्याचे दिसते. हिंमत असेल तर या अधिवेशनाची तारीख सरकारने जाहीर करावी, असे त्यांनी सांगितले.
---------------------------------------------------------------------
कोट............
मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे, तर विशेष अधिवेशन घेण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
- संजय मंडलिक, खासदार,
---------------------------------------------------------------------
कोट............
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहोत. पालकमंत्री सतेज पाटील पाठपुरावा करत आहेत. खासदार संभाजीराजे यांचा राज्यभर दौरा सुरू आहे. राजकारण टाळून सर्वांनी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा.
- ऋतुराज पाटील,आमदार