कोल्हापूर : महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्राला वेगळी परंपरा आहे. राज्यात ६३ नाट्यगृह असून, त्यांना एकाच छताखाली आणले पाहिजे. ही नाट्यगृह सुस्थितीत ठेवण्यासाठी राज्य शासनाने एकदाच भरीव असा ४०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी केली. या निधीतील व्याजातून नाट्यगृहांची देखभाल आणि नूतनीकरण करता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमु्ख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख नक्कीच याचा सकारात्मक विचार करतील, असेही त्यांनी सांगितले.
प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स यांनी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकामध्ये प्रशांत दामले व कविता लाड यांच्यासोबत अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, राजसिंह देशमुख आदींच्या भूमिका आहेत. हे सुपरहिट नाटक प्रथमच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, कोल्हापुरात शनिवारी (दि. २०) दुपारी ४ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. याचबरोबर शुक्रवारी (दि. १९) सातारा, रविवारी (दि. २१) सांगली आणि सोमवारी (दि. २२) कऱ्हाडमध्ये प्रयोग होणार आहेत. या नाटकानिमित्ताने दामले पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून, गुरुवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
दामले म्हणाले, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगाला १७ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रारंभ झाला. लवकरच नाटकाचा ४०० वा प्रयोग सादर होणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही या नाटकाने हाऊसफुल्लची पाटी कायम ठेवली आहे. इम्तियाज पटेल यांच्या कथेवर हे नाटक आधारित आहे. संगीत अशोक पत्की यांनी दिले आहे. कोरोनामध्ये संकटात आलेले नाट्यक्षेत्र पुन्हा जोमाने सुरु होण्यासाठी विविध पातळीवर मदत होत आहे. नाट्यगृहांनी भाड्यात सवलत दिल्याने, टोल माफ केल्यामुळेच नाटक करणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला महाजन पब्लिसिटीचे गिरीश महाजन उपस्थित होते.
चौकट
नुसता अभिनय चांगला असून चालत नाही. रंगभूमीवर प्रेम असावे लागते. नाट्य प्रयोगातू्न केवळ पैसे मिळवणे, हा उद्देश असता कामा नये. नाट्य चळवळ टिकली पाहिजे, असे दामले यांनी सांगितले. सुट्टीदिवशी प्रयोगांना गर्दी होते. मात्र, इतर दिवशी तोटा होणार, असे अपेक्षित ठेवूनच प्रयोग करत असल्याचेही ते म्हणाले.
फोटो : प्रशांत दामले यांचा वापरणे