इचलकरंजी : राज्य सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, या मागणीसाठी येथील मलाबादे चौकात भाजपच्यावतीने चक्काजाम आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मुख्य चौकातच केलेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
राज्य सरकारने ओबीसी समाजाचा अहवाल न मांडल्याने सर्वोच्च न्यायालयात ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले, त्यामुळे ओबीसीचे आरक्षण पूर्ववत ठेवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत इचलकरंजीतील भाजपच्यावतीने मलाबादे चौकात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारने मागास अहवाल पूर्ण करून ओबीसी समाजातील प्रत्येक घटकांना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची मागणी करण्यात आली, तसेच यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवणे चुकीचे असून, त्यांनी सुप्रीम कोर्टात ओबीसी समाजाचा अहवाल सादर करावा, अन्यथा आरक्षण मिळेपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात नगराध्यक्ष अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार , जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, विजया पाटील, शहराध्यक्ष अनिल डाळ्या, नगरसेवक अजित जाधव, मनोज हिंगमीरे, मिश्रिलाल जाजू, धोंडीराम जावळे सहभागी झाले होते.