कोल्हापूर : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या वैद्यकीयसह अन्य अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य शासनाने सुपर न्युमररी (अधिसंख्य) जागा वाढवून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. त्यावर याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने त्यांना बोलाविले आहे.मुंबईत मंगळवारी (दि. १ डिसेंबर) बैठक होणार आहे. त्या दरम्यान ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नाकडे लोकमतने एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये मराठा तरुणांची कोंडी या वृत्ताद्वारे शनिवारी (दि. २१) लक्ष वेधले. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून याबाबतच्या अन्य वृत्तांच्या माध्यमातून लोकमत पाठपुरावा करीत आहे. त्याची दखल घेत खासदार संभाजीराजे यांनी दि. २४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले होते.
त्यावर सुपर न्युमररीसह मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुंबईला येण्याचे निमंत्रण सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दूरध्वनीवरून दिले आहे. या चर्चेमध्ये मी सुपर न्युमररीचा मुद्दा मांडणार आहे. या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे हे चर्चेसाठी वेळ देणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कळविण्यात आले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी दिली.