जयंत पाटील, सतेज पाटील, मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने तुटपुंजी मदतीचा निर्णय घेतला असून, तो कदापि मान्य करणार नाही. ३१ ऑगस्टपर्यंत पूरग्रस्तांच्या मदतीचा अध्यादेश न बदलल्यास १ सप्टेंबरला नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, महापुराबाबत अभ्यास गट नेमावा, पूरग्रस्तांचे विनाअट पुनर्वसन करावे, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळावे या मागण्यांसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. ऐतिहासिक दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात झालेल्या सभेत शेट्टी यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील, आराेग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर सडकून टीका केली.
शेट्टी म्हणाले, राज्य सरकारने पूरग्रस्तांची चेष्टा सुरू केली आहे. पुनर्वसनासाठी मूळ जागा ताब्यात घेण्याची भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार करीत आहेत. रस्त्यांसह इतर शासकीय प्रकल्पासाठी चारपट दराने जमिनी खरेदी करता, मग पूरग्रस्तांसाठी का नाही. कोल्हापुरात पहिल्यांदाच असा पाऊस पडलेला नाही, त्यामुळे पुराच्या पाण्याचे अडथळे शोधण्याऐवजी मंत्री जयंत पाटील हे नदीला भिंत बांधण्याची भाषा करीत आहेत. बोगद्यातून राजापुरात पाणी सोडणार आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशा प्रकारच्या खर्चिक कामात ‘रस’ असतो. महापूर येऊन एक महिना झाला. शेतकऱ्यांना अद्याप दमडीचीही मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा मोर्चा काढू नका, असा सल्ला देणारे आतापर्यंत झोपले होते का? अशा शब्दांत त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना फटकारले आहे. माझ्या हवेचा अंदाज घेण्यापेक्षा नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भेट घेणारे शरद पवार यांना हसन मुश्रीफ यांनी विचारावे. माझ्या नादाला लागू नका, महागात पडेल, असा इशाराही त्यांनी मुश्रीफ यांना दिला. जादा दराने ‘पीपीई’ किट, मास्क खरेदी केले, हे पैसे कोणाच्या घशात गेले, अशी विचारणा करीत आराेग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर निशाणा साधला. ‘स्वाभिमानी’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जनार्दन पाटील, विठ्ठल मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
‘चळवळ टिकली पाहिजे’
गेल्या तीन-चार वर्षांत सरकारविरोधात ‘स्वाभिमानी’चा मोर्चा निघालेला नव्हता. त्यामुळे या मोर्चात तरुण कार्यकर्त्यांची संख्या अधिक होतीच, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये उत्साह कमालीचा होता. बहुतांशी कार्यकर्त्यांनी ‘चळवळ टिकली पाहिजे’ असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या.
बेडकिहाळ येथे पूर परिषद
चिक्कोडी, अथणी या तालुक्यांत महापुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सीमा भागातील शेतकऱ्यांची बेडकिहाळ येथे पुढील आठवड्यात पूर परिषद घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
वसंत भोसले, यदु जोशी यांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा उल्लेख
‘लोकमत’चे कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांनी ‘महापूर आणि वास्तव’, तर मुंबईचे वरिष्ठ सहायक संपादक यदु जोशी यांचा ‘टक्केवारीत राज्य अडकले, गडकरींचा वैताग’ या अभ्यासपूर्ण लेखांचा ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी उल्लेख करीत कौतुक केले.