कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीतर्फे शुक्रवारी (दि. २५ जून) दुपारी एक वाजता नवी मुंबई येथील माथाडी भवनमध्ये राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद होणार आहे. राज्य सरकारकडून आरक्षण आणि अन्य मागण्यांबाबत मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. त्याबाबतची पोलखोलदेखील या परिषदेमध्ये केली जाणार असल्याचे मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने सक्षम पुनर्विचार याचिका दाखल करावी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी संस्थेसाठी प्रत्येकी दोन हजार कोटींची तरतूद करावी, आदी विविध १४ मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा या गोलमेज परिषदेमध्ये ठरविण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार नरेंद्र पाटील, रमेश पाटील, प्रसाद लाड, आदींसह मराठा समाजातील विविध ४२ संघटनांचे प्रतिनिधी, इतिहासतज्ञ सहभागी होणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवाजीराव लोंढे, जयदीप शेळके, भरत पाटील, आदी उपस्थित होते.