कोल्हापूर : राज्यातील अकृषी विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात अधिसूचना निर्गमित केली आहे. या अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आलेल्या अडचणी, त्रुटींबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी शिवाजी विद्यापीठात आज, शनिवार, दि. २६ आणि उद्या, रविवारी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या संघटनांची राज्यस्तरीय बैठक होणार आहे.
विद्यापीठातील सेवक संघाच्या कार्यालयात शनिवारी सकाळी अकरा वाजता राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाची, तर रविवारी सकाळी दहा वाजता सेवक संयुक्त कृती समितीची बैठक होणार आहे. राज्यातील विद्यापीठांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. या वेतन आयोगाचे लाभ मिळविण्यासाठी काही जाचक अटी अडथळा ठरत आहे. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले दोन शासन पुनरुज्जीवित करणे, आदींबाबत चर्चा करून पुढील निर्णय या बैठकांमध्ये घेतला जाणार आहे. महाविद्यालयीन रजिस्ट्रार असोसिएशन, राज्य तांत्रिक कर्मचारी कृती समिती, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी, प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित असणार आहेत.