कोल्हापूर : शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे (कामगार विभाग) राज्यस्तरीय औद्योगिक सुरक्षा रॅली काढण्यात येत आहे. नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून शुक्रवारी सुरू झाली. १२ मार्चपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांतून ही रॅली जाणार आहे.कारखाने अधिनियम १९४८ या कायद्याच्या अंमलबजावणीस यावर्षी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून राज्य शासनाचा औद्योगिक सुरक्षा विभाग, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, विदर्भ अॅक्शन सेंटर व दी सेफ्टी कॉन्फिडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने ही रॅली काढण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे सहसंचालक राजेंद्र खडामकर यांनी दिली. ही सुरक्षेची मशाल नागपूर, अकोला, नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रायगड विभागांतून जाणार आहे. प्रथमच आयोजिलेल्या रॅलीत राज्यभरातील सुमारे अडीच लाख कामगार सहभागी होत आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. बुधवारी (दि. ९) चिपळूण येथे सुरक्षा मशालीचे आगमन होणार आहे. तिथे रॅली काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर विभागातील कामगार, अधिकारी सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेले कामगार, सुरक्षा अधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे.औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या रॅलीच्या माध्यमातून सुरक्षेची जाणीव वृद्धिंगत होण्याबरोबरच व्यवस्थापन व कामगार यांच्या प्रयत्नातून सुरक्षेचा संदेश पोहोचण्यास मदत होईल.- राजेंद्र खडामकर, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कोल्हापूर विभाग
औद्योगिक सुरक्षेनिमित्त राज्यस्तरीय रॅली
By admin | Published: March 05, 2016 12:36 AM