अतुल आंबीइचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयाचे रुपडे आता पालटले आहे. विविध सेवा-सुविधांसह अत्याधुनिक मशीनरीमुळे रुग्णालयात गर्दी वाढू लागली आहे. या सुविधांमध्ये वाढ होत जाऊन आगामी चार ते पाच महिन्यांत बर्न (जळीत विभाग), डायलेसेस, अपघातग्रस्त शस्त्रक्रिया असे विभागही पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालय (आयजीएम) ची अवस्था खूपच बिकट बनली होती. त्यामुळे हे रुग्णालय सन २०१६ साली शासनाने ताब्यात घेतले. त्यानंतर हळूहळू काही सुविधा सुरू करण्यात आल्या. मात्र, वारंवार राजकीय टीकाटिप्पणीचा अड्डा बनल्याने नाहक बदनामी होऊन सुविधा सुरू होण्याचा कालावधी खूपच लांबला.तब्बल पाच वर्षानंतर आता रुग्णालयाचे रुप बदलत आहे. अंतर्गत इमारत दुरूस्ती, रंगरंगोटी, आधुनिकीकरण केल्याने नवे रुप खुलून दिसत आहे. तसेच रुग्णांसाठी आवश्यक सेवा सुरू केल्याने गर्दीही वाढत आहे. नव्याने पदभार स्वीकारलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांनी रुग्णालयातील सर्वांचा एकमेकांशी समन्वय व योग्य नियोजन केल्याने अधिक फरक दिसत आहे. दररोज सुमारे ५०० बाह्यरुग्ण येतात. त्यातील अंदाजे १०० रुग्ण अॅडमिट होतात.
प्रसूती विभागरुग्णालयात महिलांसाठी प्रसूती विभाग सोनोग्राफीसह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला असून, या महिन्यात चौदा नियमित व अठरा सिजेरीयन प्रसूती झाल्या. ही सुविधा पूर्णपणे मोफत असल्याने खासगी रुग्णालयांत किमान वीस हजार रुपयांपासून ते ८० हजार रुपयांपर्यंत येणारा खर्च वाचत आहे. लवकरच महिला नसबंदीही सुरू होणार आहे.
अस्थिरोग विभागअपघातग्रस्त विभागात एक्स-रे व प्लास्टर करणे सुरू झाले आहे. अतिदक्षता विभाग सुरू झाल्यानंतर शस्त्रक्रियाही सुरू होईल. याला आणखीन तीन महिन्यांचा कालावधी लागेल.
अत्याधुनिक दक्षता विभागरुग्णालयात नव्याने निर्माण केलेल्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची सीपीआर रुग्णालयाच्या पथकाने पाहणी केली आहे. त्याचा अहवाल पाठविला असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्यामध्ये रुग्णांसाठी २४ खाट (बेड) सुरू होणार आहे. त्यात १० व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. तसेच लहान मुलांसाठी बारा बेड असून, त्यामध्ये चार बेड व्हेंटिलेटरचे आहेत.
लवकरच ३०० बेडसध्या २०० बेडचे रुग्णालय असून, ३०० बेडचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तो लवकरच मंजूर होईल, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर अन्य सर्वच सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. त्याचबरोबर मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठीही आमदार आवाडे यांचे प्रयत्न सुरू आहेत.
तातडीची गरजरुग्णालयाला सध्या सर्जन, रेडिओलॉजिस्ट, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची तातडीने आवश्यकता आहे. यांची उपलब्धतता झाल्यानंतर आणखीन काही सेवा तत्काळ सुरू होणार आहेत.