कळंबा : दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील कळंबा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवार सागर भोगम यांनी भाजप महाडिक गटाचे उमेदवार बाजीराव पोवार यांचा ९७४ मतांनी पराभव केला. १७ प्रभाग सदस्यांपैकी पूर्वी १ सदस्य सतेज पाटील गटाचा बिनविरोध निवडून आला; तर उर्वरित १४ सदस्य सतेज पाटील गटाचे तर २ अपक्ष निवडून आल्याने आता कॉँग्रेसचे १५ व २ अपक्ष असे बलाबल झाले.
आरक्षणाच्या फेरसोडतीने पुढे गेलेल्या कळंबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी चुरशीने ८१.५२ टक्के मतदान झाले. शनिवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी पार पडली. सरपंचपदासाठी दहा उमेदवार रिंगणात होते. यात कॉँग्रेसचे सागर भोगम २४२२, भाजप महाडिक गटाचे बाजीराव पोवार १४४८ अपक्ष दीपक तिवले ११५२ मते मिळाली. सागर भोगम ९७४ मतांनी विजयी झाले. उर्वरित सात अपक्षांत ६५० मते मिळाली.तर १७ प्रभाग सदस्यांच्या लढतीसाठी ५७ उमेदवार रिंगणात होते. यापैकी प्रभाग चारमधून पूर्वीच आशा टिपुगडे बिनविरोध निवडून आल्या. तर उर्वरित १६ सदस्यांपैकी १४ सतेज पाटील गटाचे तर दोन अपक्ष निवडून आल्याने सतेज पाटील गटाने ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले.
प्रभाग १ मधून कॉँग्रेसचे राजेंद्र नारायण गुरव, विजय विश्वास खानविलकर, राजश्री प्रकाश पाटील, विजयी प्रभाग २ मधून कॉँग्रेसचे रोहित दिलीप मिरजे, शितल कृष्णात जंगम, विजयी प्रभाग ३ मधून कॉँग्रेसचे अरुण गजानन पाटील, सुहास प्रभाकर जंगम, संगीता शिवाजी तिवले विजयी. प्रभाग ४ मधून कॉँग्रेसचे मीना मारुती तिवले, संग्राम महादेव चौगुले, आशा मनोज टिपुगडे विजयी. प्रभाग ५ - शालिनी रामचंद्र पाटील (अपक्ष), तर कॉँग्रेसचे कांबळे सत्यभामा अमित, शिंदे सोमनाथ लक्ष्मण विजयी. प्रभाग ६ - कॉँग्रेसचे वैशाली संजय मर्दाने,उदय जाधव, तर अपक्ष अलका माने असे विजयी झाले .निवडीनंतर विजयी उमेदवारांनी गावातून रॅली काढली.दीर-भावजय विजयीप्रभाग सदस्यपदी एकाच घरातील दीर-भावजय निवडून आले. प्रभाग एकमधून राजश्री प्रकाश पाटील, तर प्रभाग तीनमधून अरुण गजानन पाटील विजयी झाले.१५ नवीन चेहरेगतवेळच्या १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी सहाजण निवडणूक रिंगणात होते. चारजण पराभूत झाले; तर दोन सदस्य उदय जाधव व अलका माने प्रभाग सहामधून निवडून आले. १५ नवीन चेहरे ग्रामपंचायतीच्या राजकारणात आले. सर्वांत कमी वयाचे २२ वर्षांचे रोहित दिलीप मिरजे निवडून आले.कळंबा ग्रामपंचायतीत बहुमत मिळाल्यानंतर सागर भोगम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली.