कोल्हापूर : राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी कोल्हापुरात जवळपास ११ ठिकाणी रंगीत तालमी सुरू असून, कलाकार, निर्माते, मान्यवर संघांची धावपळ सुरू आहे. दरम्यान, केशवराव भोसले नाट्यगृहात उद्या, गुरुवारी या स्पर्धेचे उद्घाटन होत आहे.महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. स्पर्धेत २४ संघांनी सहभाग नोंदवला असून, यातील सहा संघ नवीन आहेत. विशेष म्हणजे तब्बल११ संघ कोल्हापूर जिल्ह्यातील असल्यामुळे या स्पर्धांना रसिकांचा याहीवर्षी भरभरून प्रतिसाद मिळणार आहे. येथील केशवराव भोसले नाट्यगृहात रोज सायंकाळी सात वाजता ही नाटके सादर होणार आहेत. स्पर्धेत सहाहून अधिक संहिता नव्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील नाट्यसंस्थांनी सुरुवातीपासूनच सहभाग नोंदविलेला आहे.दरवर्षी सांगलीसह कोकण विभागातील काही संघ यात सहभागी होत असतात. यंदा मात्र कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, जयसिंगपूर, आजरा, चंदगड, कागल या तालुक्यांमधूनही संघांनी नोंदणी केली आहे. कोल्हापुरातील अभिरुची, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्र, गायन समाज देवल क्लब, हृदयस्पर्शी हौशी सांस्कृतिक व्यासपीठ, परिवर्तन कला फौंडेशन यांसारख्या नाट्यसंघाच्या तालमी जोरात सुरू आहेत. नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, कलाकार या स्पर्धेच्या तयारीसाठी धावपळ करीत आहेत. कोल्हापूर शहरात दिलबहार तालीम, शेकाप कार्यालय, शेंडा पार्क, देवल क्लब, प्रायव्हेट हायस्कूल, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र यांसारख्या जवळपास ११ ठिकाणी रंगीत तालमी सायंकाळी रंगतआहेत.बेळगावसह जिल्ह्यातील नाट्यसंस्थांचा प्रतिसादपाचगाव, कळंबा, कसबा बावडा, भुयेवाडी परिसरातील नाट्यसंस्थांची नाटके स्पर्धेत आहेत. जयसिंगपूरची नाट्यशुभांगी, वारणानगरची प्रज्ञान कला अकादमी, आजरा येथील कृषिदूत कृषिविज्ञान आणि नवतरुण नाट्यसंस्था, इचलकरंजी येथील निष्पाप कलानिकेतन सेवा संस्था, रंगयात्रा नाट्यसंस्था, चंदगड येथील श्री साई नाट्यधारा मंडळ, सेनापती कापशी येथील राणी अहिल्याबाई वाचन मंदिर, शहापूर-बेळगाव येथील श्री सरस्वती वाचनालय सहभागी झाले आहे.उद्घाटन गुरुवारीउद्घाटन महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते आणि मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुईगडे यांच्या उपस्थितीत होईल. ज्येष्ठ रंगकर्मी अनिल सडोलीकर यांचा सत्कार करण्यात येईल, असे समन्वयक मिलिंद अष्टेकर, प्रशांत जोशी यांनी सांगितले.
‘राज्य नाट्य’चा पडदा उद्या उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:41 PM