कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके या चुलत्या-पुतण्यांमध्ये कमालीचा राजकीय समझोता आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांची स्वतंत्र भूमिका असली, तरी त्याला विधानसभा व ‘गोकुळ’च्या राजकारणाची किनार आहे; पण आगामी विधानसभा निवडणुकीत ते एकत्रितच काम करणार हे निश्चित आहे.डी. सी. नरके यांनी ‘कुंभी’ सोडून इतर राजकारणात कधीच हस्तक्षेप केला नव्हता. अरुण नरके यांनी ‘गोकुळ’, जिल्हा बॅँकेसह जिल्हास्तरावरील राजकारण सांभाळले. डी. सी. नरके यांच्या पश्चातही आमदार चंद्रदीप नरके व अरुण नरके यांनी समझोत्यानुसारच राजकारणाची दिशा ठरविली. विधानसभा व साखर कारखाना आमदार नरके यांच्या, तर ‘गोकुळ’सह इतर राजकारण अरुण नरके यांच्यासोबत राहायचे, असा अलिखित समझोता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत संदीप नरके यांनी कॉँग्रेसच्या वतीने कळे जि.प.तून निवडणूक लढविल्यानंतर नरके कुटुंबात थोडा तणाव निर्माण झाला होता.गत लोकसभा निवडणुकीत आमदार नरके हे मंडलिक यांच्यासोबत, तर अरुण नरके हे महाडिक यांच्या पाठीशी होते. त्यावेळी ‘करवीर’मधून महाडिक यांना ३४ हजारांचे मताधिक्य मिळाले व तेच मंडलिकांच्या पराभवास कारणीभूत ठरले. त्याची झळ आमदार नरके यांना सोसावी लागली. त्यात ‘गोकुळ’च्या राजकारणात महाडिक, पी. एन. पाटील एकत्र आहेत. विधानसभेला ‘गोकुळ’च्या यंत्रणेचा आमदार नरके यांना त्रास होत असल्याने त्यांनी टार्गेट केले आहे. अरुण नरके हे सत्तारूढ गटाबरोबर असतानाही आमदार नरके यांनी ‘गोकुळ’च्या सभेत आक्रमक भूमिका घेतली. त्या रागापोटी महादेवराव महाडिक यांनी नरकेंना विधानसभेला पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा केली; त्यामुळे नरके अधिक आक्रमक झाले आहेत.आमदार नरके यांच्यादृष्टीने विधानसभा महत्त्वाची आहे, आता आक्रमकपणे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचले तर त्याचा फायदा पुढे होऊ शकतो. मंडलिक यांना मताधिक्य देऊन ‘मातोश्री’वर वजन वाढविता येणार आहे. अरुण नरके व महादेवराव महाडिक यांची जुनी दोस्ती आहे. ‘गोकुळ’ राजकारणात महाडिक यांच्यासोबत, तर विधानसभेला आमदार नरके यांनाच साथ देणार हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केल्याने त्यांच्यात संघर्ष उफाळण्याची शक्यता कमी आहे.हात धरायचा नाही...!अरुण नरके यांनी मेळावा घेऊन महाडिक यांच्यामागे ताकद लावल्याने नरके गटात फूट पडल्याची चर्चा सुरू आहे; पण जिल्ह्यात कोणत्याच कुटुंबाअंतर्गत समझोता नसेल इतका नरके कुटुंबात आहे. कोणी कोठे थांबायचे आणि कोणाला कशी चाल द्यायची, याबाबत त्यांचा कोणी हात धरायचा नाही.
नरके चुलत्या-पुतण्यांत अंतर्गत राजकीय समझोता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:37 AM