सुशांत घोरपडे -- म्हैसाळ--खतांच्या वाढणाऱ्या किमती, वातावरणातील बदल, सरकारची शेतकऱ्यांबद्दलची धोरणे, शेतकऱ्याला मिळणारा कमी भाव आणि आता त्यातच साखरसम्राटांनीही दर निश्चित झाल्याशिवाय कारखाने सुरू न करण्याचा घेतलेला पवित्रा, या सर्व कारणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’अशी झाली आहे.मागील चार ते पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या एकीमुळे व शेतकरी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला योग्य मोबदला द्यावा लागला व यातूनच अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.शेतकरी सुखी होतो न होतो तोपर्यंतच नवे सरकार आल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते सत्ताधारी सरकारला मिळाल्याने आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाली कोण राहिलाच नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. शासनाच्या एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावा, अशी मागणी होत असताना, साखरसम्राटांनीही, एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी शासनाने कारखान्यांना मदत करावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे यार्षीचा गळीत हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला, तरी दर निश्चित झाले नाहीत. त्यातच अनेकांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे.अनेक निर्माण होणारी संकटे पाहता, आपला ऊस शिवारात तसाच वाळून तर जाणार नाही ना? या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. (वार्ताहर)खासदार आक्रमक होणार का ?शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन जे लढले व शेतकऱ्यांच्या जिवावर खासदार पदापर्यंत पोहोचले, ते राजू शेट्टी आता सरकारविरोधात किती आक्रमक होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
ऊस उत्पादकांची अवस्था ‘ना घर का ना...’
By admin | Published: October 12, 2015 10:36 PM