कोल्हापूर : आसाम रायफलमध्ये भरती करून देतो, म्हणून पैसे घेऊन गंडा घालणारे रॅकेट राज्यभर असून त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती करवीर पोलिसांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी नोकरी लावतो म्हणून भाच्याला मामाने गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला. त्याप्रकरणी संशयितांवर यापूर्वी लक्ष्मीपुरीसह अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दत्तात्रय बळवंत सुतार (रा. सांगरुळ, ता. करवीर) आणि त्याचा साथीदार शिवाजी कदम (आवळी, ता.पन्हाळा) अशी संशयितांची नावे आहेत. करवीर पोलीस ठाण्यात याबाबत दि.१७ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप या संशयितांना पोलिसांनी अटक केलेली नाही.आसाम रायफलमध्ये भरती करतो म्हणून मामा सुतार याने भाच्याकडून तीन लाख रुपये घेतले. त्यानंतरही बनावट ऑडर देऊन तब्बल सहा लाख रुपयांना गंडा घातला. भाच्याने शेतजमीन विकून हे पैसे मामाला दिले होते.
हे रॅकेट राज्यभर असून इतर जिल्ह्यांतूनही फसवणुकीचा प्रकार झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे, लवकरच दोघांनाही अटक करणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.