कोल्हापूर : शहरांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाकांशी स्मार्ट सिटी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शहरांच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळेच स्मार्ट सिटी योजनेबाबत सर्वांनाच आकर्षण आहे. ही वस्तुस्थिती असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या योजनेला बोगस म्हणत आहेत. त्यांची ही टिप्पणी म्हणजे बालीशपणाचा कळस आहे, अशी टीका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.प्रभाग क्रमांक २४ साईक्स एक्स्टेंशनमधील भाजप-ताराराणी महायुतीचे उमेदवार कुलदीप देसाई यांच्या प्रचारासाठी आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, काँग्रेसचे इतर नेते मात्र कोल्हापूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करू, अशा वल्गना करीत आहेत. काँग्रेस नेत्यांचा योजनेबाबतच्या वक्तव्यांमधील विरोधाभास केवळ अज्ञानामुळेच आहे. केंद्रात आणि राज्यात विरोधी बाकावर असणारे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करणार] ही घोषणा कोणत्या आधारावर करतात, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. विकासकामांच्या नावाखाली महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केवळ ढपलेबाजी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मोठ्या मोठ्या घोषणा करीत आहेत; पण त्यासाठी निधी कोठून आणणार, याबाबत बोलण्यास मात्र तयार नाहीत. दुसरीकडे स्मार्ट सिटी योजना बोगस असल्याचा शोध लावणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या चेल्यांनी याच योजनेअंतर्गत कोल्हापूर शहराचा विकास साधू, अशी केलेली वक्तव्य म्हणजे जनतेची शुद्ध फसवणूक असून, त्यांनी आधी एकत्र बसून या योजनेचा अभ्यास करावा. सर्वच प्रभागांतील महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन शहराला पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर नेऊया, असे आवाहन त्यांनी केले. सभेला उमेदवार कुलदीप देसाई, आप्पासाहेब देसाई, मनोज आडके, रमणभाई पटेल, दीपकभाई पटेल, अरुण चौगले, कमलाकर घोलप, डॉ. नरेंद्र चौगले यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते तसेच महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
‘स्मार्ट सिटी’बाबतची विधाने बालीशपणाची
By admin | Published: October 27, 2015 12:34 AM