To: >
वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जनता दलाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
कसबा तारळे :
देशात व राज्यात पेट्रोलच्या दराचा भडका उडाल्याने शंभरी ओलांडलेल्या पेट्रोलच्या भाववाढीत सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. अशातच जीवनावश्यक वस्तूंचे दरही भडकल्याने शेतकरी, मजूर, भूमिहीन यांचे कंबरडेच मोडल्याने जगण्यासाठी असून संघर्ष सुरु आहे. याची दखल मोदी सरकारने घ्यावी व महागाई कमी करावी, अशा मागणीचे लेखी निवेदन जनता दलाच्या वतीने राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, खते, पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस दरवाढ झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला आहे. परिणामी महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या उपासमारीची वेळ आली आहे.
या वेळी बोलताना जनता दलाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव पाटील (कंथेवाडी) यांनी या निवेदनाची केंद्र शासनाने दखल घेऊन महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले. निवेदनावर राधानगरी तालुकाध्यक्ष विठ्ठल मुसळे, युवा अध्यक्ष शरद पाडळकर, शुभम पाटील, वाय. डी. पाटील, लहु गुरव, संभाजी सायेकर, साताप्पा ऱ्हाटवळ आदींच्या सह्या आहेत.