इचलकरंजी : कोल्हापूर विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवारी आपल्या कुटुंबात नको यासाठी महाडिक-आवाडे कुटुंबीयांमध्ये उमेदवारी ढकलाढकली झाल्याचे चित्र शुक्रवारी इचलकरंजीत झालेल्या बैठकीत पुढे आले. राहुल आवाडे उमेदवार असता तर आम्हीही थांबलो असतो, असे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी चक्क सर्वांसमोर बैठकीतच सांगितल्याने आमदार प्रकाश आवाडे यांचीही चांगलीच पंचाईत झाली.
घडले ते असे : विधानपरिषदेचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या पाठिशी आवाडे गटाची ताकद उभी करावी यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत येथील बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या ताराराणी पक्षाच्या कार्यालयात आवाडे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यास ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासह माजी आमदार महाडिक, अमल महाडिक, राहुल आवाडे आदी प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीलाच आमदार आवाडे प्रास्ताविक करायला उभे राहिले. ते म्हणाले, भाजपची उमेदवारीबद्दल आमच्या राहुलचेही नाव आले होते. परंतु एकत्रितपणाने निर्णय झाला आणि अमल याचे नाव निश्चित झाले. यावेळी शेजारीच बसलेल्या माजी आमदार महाडिक यांनी त्यास तीव्र हरकत घेतली. ते त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले, नाही..नाही असे काही झालेले नाही. राहुल उमेदवार असता तर आम्हीही थांबलो असतो दादा..यावेळी महाडिक हातवारे करत असल्याचे दिसले. हा सगळी मिश्किल चकमक चंद्रकांत दादाही मंद हसत पाहत होते.आमदार आवाडे म्हणाले, आम्ही आता अमलची उमेदवारी फायनल केली असली तरी लोकसभेला राहुल आहे. सभागृहात राहुल आवाडे यांच्या नावाच्या घोषणा घुमू लागतात..लगेच राहुल आवाडे यांची हातकणंगले लोकसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित झाल्याच्या पोस्टही व्हायरल होतात. सरकार..सरकार म्हणून राहुल आवाडे यांचे लोकसभेचे उमेदवार म्हणून सोशल मीडियावर जोरदार मार्केटिंग केले जाते.
विधानपरिषदेला आम्ही थांबलो म्हणून लोकसभेला उमेदवारी द्या असे राजकीय गणित मांडण्याचा आवाडे गटाचा प्रयत्न होता, परंतु त्यास महाडिक यांनी छेद दिला.