छत्रपती संभाजी महाराजांबाबत वक्तव्य: कोल्हापुरात भाजपतर्फे अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन
By समीर देशपांडे | Published: December 31, 2022 05:23 PM2022-12-31T17:23:04+5:302022-12-31T17:23:44+5:30
'पवार कुटुंबाला आता धडा शिकवण्याची वेळ'
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे म्हणणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे शनिवारी भाजपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहन करण्यात आले.
यावेळी अजित पवारचा धिक्कार असो, अजित पवारचे करायचे काय, खाली डोक वर पाय, धरणबहाद्दुर अजित पवार, जनता करेल तुला तडीपार, अशा घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्त केला. भाजप प्रवक्ते अजित ठाणेकर, सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी तीव्र शब्दात पवार यांचा निषेध केला.
भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, आम्ही आदर्श मानतो त्या संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणार नाही असे अजित पवार म्हणतात. छ. संभाजी महाराजांनी आपल्या देहाच्या हालअपेष्टा सहन केल्या पण धर्म बदलला नाही. औरंगजेबाला टक्कर दिली अशा महाराजांबद्दल बोलण्याचे धाडस पवार यांनी केले आहे. पवार घराणे कायम धर्मावरती राजकारण करत आले आहे, कधी हिंदू धर्माविषयी चांगले बोललेले नाहीत, अशा या पवार कुटुंबाला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव म्हणाले , ज्या छ. संभाजी महाराजांनी आपल्या देशाचे नाव सातासमुद्रापार नेले असे छ. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे म्हणणाऱ्या अजित पवारचा धिक्कार करतो. पवार यांनी बोलताना जरा भान ठेवून बोलले पाहिजे.
यावेळी भाजप सरचिटणीस दिलीप मेत्रानी, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, अमोल पालोजी, संतोष भिवटे, संजय सावंत, विजय आगरवाल, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, रवींद्र मुतगी, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विजयसिंह खाडे-पाटील, प्रताप देसाई, सुभाष रामुगडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.