जयसिंगपूर : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले तीनही कायदे रद्द करावेत, या मागणीचे राज्यातील ६ लाख ७६ हजार शेतकऱ्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रविवारी मुंबई येथे देण्यात आले.
गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यांतील लाखो शेतकरी कृषी कायदे मागे घेण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. देशातील सर्वच राज्यांतून या आंदोलनास शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून हे आंदोलन दोन राज्यांतील शेतकऱ्यांचे असल्याचे भासवून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६ लाख ७६ हजार शेतकऱ्यांचे तीनही शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याचे निवेदन राज्यपाल कोश्यारी यांना देऊन केंद्र सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधातील तीव्र भावना कळविण्याचे विनंती करण्यात आल्याची माहिती माजी खासदार शेट्टी यांनी दिली.
शिष्टमंडळात आमदार कपिल पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, अर्जुन कोकाटे, राष्ट्र सेवा दलाचे अतुल देशमुख, गोवर्धन दबडे, सचिन शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोट - शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखून हे निवेदन केंद्र सरकारला तातडीने पाठवून देऊ, असे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिले असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो - २८०२२०२१-जेएवाय-०८
फोटो ओळ - मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबतचे निवेदन माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले. यावेळी आमदार कपिल पाटील, प्रतिभा शिंदे, अर्जुन कोकाटे उपस्थित होते.