भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा साखर संचालक आणि जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा विनंती करून ही सभा ऑनलाईनऐवजी सभासदांच्या उपस्थितीत ऑफलाईन घ्यावी, अशा मागणीचे निवेदन शेकापच्यावतीने कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील व अशोकराव पवार पाटील, माजी संचालक एकनाथराव पाटील आणि माजी जि. प. सदस्य बाबासाहेब देवकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी दिले. निवेदनात पुढे म्हटले आहे, कारखान्याची २०१९/२० ची सभा येत्या शनिवारी आहे. ही सभा कोविडच्या प्रादुर्भावामुळे सभासदांना एकत्रित न आणता ऑनलाईन घ्यावी लागत आहे; परंतु आपल्या परिसरामध्ये ऑनलाईन सभा कधीही झालेली नाही. तसेच कारखान्याच्या आर्थिक कारभारावर काहीही बोलता येणार नाही, तर काही प्रश्न उपस्थित करता येणार नाहीत. तसेच सर्वच शेतकऱ्यांकडे टचस्क्रीन मोबाईल नाहीत. तरी ही सभा ऑनलाईनऐवजी ऑफलाईन घ्यावी. या सभा घेण्यासाठी ३१मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे.
याबाबत कारखान्याच्यावतीने साखर संचालक, जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करुन ऑनलाईनऐवजी ३१ मार्चनंतर दोन महिन्यांची मुदतवाढ घ्यावी आणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही सभा घ्यावी. यावेळी शे का पक्षाचे राधानगरी तालुका चिटणीस अंबाजी पाटील, श्रीपती पाटील, संजय डकरे, रमेश पाटील, डी. पी. कांबळे, पी. एस. पाटील, जयवंत पाटील, आनंदराव पाटील, आदी उपस्थित होते. निवेदनावर माजी संचालक दत्तात्रय हणमा पाटील, विश्वास वरूटे व संभाजी पाटील आदींसह सभासदांच्या सह्या आहेत.