घन:शाम कुंभार : यड्राव :शासनाच्या राज्य युवा महोत्सवात शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी मिळवलेले यश, विविध प्रकारात जाहीर झालेले निकाल व स्वयंसेवकांचे गायब झालेले मानधन या शासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने संभ्रम निर्माण झाला आहे. स्पर्धकांनी याबाबत घेतलेल्या आक्षेपास अधिकाऱ्यांनी बेदखल केल्याने महोत्सव संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याची सखोल चौकशीची मागणी स्पर्धकांनी केली असली तरी वरिष्ठ अधिकारी संबंधितांना पाठीशी घालतात की स्पर्धकांना न्याय मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने इचलकरंजी येथे एकांकिका, लोकनृत्य, लोकगीत व शास्त्रीय गायनासह इतर स्पर्धा झाल्या. एकांकिका स्पर्धेत अमरावती, मुंबई विभाग, नाशिक यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाले; परंतु गुणतालिकेत वेगळेच गुण असल्याचे नाशिक व कोल्हापूर विभागास समजल्याने त्यांनी गुणतालिका दाखविण्याचा आग्रह केला; परंतु त्यांची मागणी बेदखल करण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्यांना व कुटुंबीयांना या स्पर्धेत भाग घेता येत नसूनही सांगलीत राहणारे, परंतु कोल्हापूरमध्ये नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्याने आपल्या पत्नीस लोकगीत स्पर्धेत, तर मुलास शास्त्रीय गायन स्पर्धेत उतरवले. मुलांचा नंबर आला, पत्नीच्या क्रमांकासाठी गोंधळ झाल्याने निर्णय बदलावा लागला, तर लोकनृत्य स्पर्धेत सलग चौदा वर्षे द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या पट्टणकोडोली येथील संघाने प्रेक्षणीय प्रदर्शन करूनही पुन्हा त्यांना द्वितीय क्रमांक मिळाल्याने पे्रक्षकांनी गोंधळ घातला.या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारे संघ राष्ट्रीय स्पर्धेत ८ ते १२ जानेवारी या कालावधीत गुवाहटी येथे जाण्यास पात्र ठरले आहेत. कोल्हापूर विभागाच्या एकांकिका संघास नाशिक संघापेक्षा जास्त गुण प्राप्त झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या स्पर्धा कालावधीमध्ये कोल्हापूर एकांकिका संघातील कलाकारांसह १२ जणांनी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. त्यांना मिळणारे मानधन न देता गायब केले आहे. संबंधित स्वयंसेवकांपैकी दोन युवतींना कार्यालयाबाहेर बोलावून पोचपावतीवर सह्या करण्यास सांगून त्यांना मानधन न देण्याचा प्रकार घडला आहे.आम्हाला न्याय व मानधन द्याएकांकिका स्पर्धेत आमच्या संघास ७८ गुण मिळाले आहेत, तर नाशिकच्या संघास ७६ गुण मिळूनसुद्धा त्यांना तृतीय क्रमांक घोषित झाला आहे. हा कोल्हापूर संघावर अन्याय आहे. स्पर्धेत क्रीडा अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे पत्नीस व मुलास उतरविले. त्याचा आक्षेप घेतल्याने आमच्या स्वयंसेवक कामाचे प्रतिदिन २५० रुपयेप्रमाणे मानधन दिले नाही. ते आम्हास द्यावे व आमच्या कलागुणांना न्याय द्यावा, असे कोल्हापूर विभागाचा एकांकिका कलाकार स्पर्धक व स्वयंसेवक अगस्ती बुक्का यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या राज्य युवा महोत्सवात गोंधळ
By admin | Published: January 02, 2015 11:36 PM