कोल्हापूर : खासगी विद्यापीठांची दोन विधेयके व स्वयंअर्थशासित शाळा या विरोधात शुक्रवारी (दि. २०) राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती ‘लोकभारती’चे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शिक्षण क्षेत्राच्या परिवर्तनासाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून ‘शिक्षकभारती’चे उमेदवार शिवाजी खांडेकर यांना उभे केल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार पाटील म्हणाले, गेल्या अधिवेशनात अमिटी व स्पायसर अॅडवेनटिस्ट या दोन स्वयंअर्थशासित विद्यापीठांची विधेयके शेवटच्या क्षणी मंजूर करण्याचे काम सरकारने केले आहे. या विधेयकांना विरोध केला; पण बहुमताच्या जोरावर मंजूर केले. विरोधक मतदानावेळी आपल्या पाठीशी राहिले; पण त्यांनी ताकदीने विरोध केला असता, तर कदाचित हे विधेयक मंजूर होऊच शकले नसते. दोन वर्षांपूर्वी असेच एक विधेयक मंजुरीसाठी विधान परिषदेमध्ये आले होते. त्यावेळीही एकमेव आपणच विरोध केला होता. या विधेयकात दलित, आदिवासी व ओबीसींसाठी आरक्षण नसल्याने सामान्य गरीब मुलांना प्रवेशच मिळणार नसल्याने विरोध केला. याच मुद्द्यावर राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी ते विधेयक सरकारकडे परत पाठविले होते. आता दोन नव्या विद्यापीठांची विधेयके मंजूर करताना गरीब विद्यार्थ्यांच्या फीचे कोणतेही दायित्व स्वीकारलेले नाही. शासनाच्या या धोरणाविरोधात शुक्रवारी आंदोलन करणार आहे. राज्यभर या धोरणाविरोधात सह्यांची मोहीम, निवेदने व अमरावती, पुणे विभागात सरकारच्या विरोधात मतदान असा कार्यक्रम शिक्षकभारतीने जाहीर केला आहे. ज्या शाहू महाराजांनी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सुरुवात केली, तो विचार पुसून टाकण्याचे काम सरकार करीत आहे. अशा प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शिक्षण खासगीकरणाविरोधात राज्यभर आंदोलन
By admin | Published: June 19, 2014 1:08 AM