कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या वैभवात भर पडणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले.जिल्हा परिषदेच्या प्रांगणात चव्हाण यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, उपाध्यक्ष सतीश पाटील, महिला बालकल्याणच्या सभापती डॉ. पद्माराणी पाटील, समाजकल्याणच्या सभापती स्वाती सासणे, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्यासह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राजची स्थापना करून सत्तेचे विक्रेंद्रीकरण केले. ग्रामीण विकासाला चालना दिली. शिवाय नव्या नेतृत्वाला संधी दिली. त्यांच्या पुतळ्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांना प्रेरणा मिळेल.प्रतिष्ठानचे अशोक पोवार म्हणाले, माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली १९८६ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली. त्यावेळी प्रतिष्ठानमध्ये माजी महापौर बळिराम पोवार, माजी नगराध्यक्ष एम. के. जाधव, के. ब. जगदाळे, के. जी. पवार, वसंतराव मोहिते, आदींचा समावेश होता. प्रतिष्ठानने पुतळा उभारणीसाठी निधी जमविला होता. त्या निधीच्या माध्यमातून ब्राँझचा पुतळा तयार केला आहे. तो आता लवकरच या परिसरात उभारला जाईल.यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील, माणिक मंडलिक, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, वसंतराव सांगावकर यांच्यासह बाळासाहेब बुरटे, प्रा. सुजय पाटील, रामभाऊ कोळेकर, नीलेश देसाई, प्रदीप काटकर, सुमित खानविलकर, विनोद डुणुंग, आदी उपस्थित होते.