अनेक आव्हाने उभी राहिली; पण न डगमगता या आव्हानांचे संधीत रूपांतर करणारा पोलादी नेता अशी महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
कागल येथील छत्रपती शाहू साखर कारखाना उभारणीत स्व. राजे विक्रमसिंह घाटगे व हमीदवाडा येथील माळरानावर सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना उभारणीत स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्यासोबत त्यांनी काम केले. या दोन्ही साखर कारखान्यांच्या उभारणीत मोठे योगदान दिले; पण काही तात्त्विक कारणांमुळे या दोन्ही कारखान्यांत त्यांना फार काळ काम करता आले नाही. ही मोठी खंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या गटाचा हक्काचा साखर कारखाना असावा, अशी कार्यकर्त्यांचीही इच्छा होती. हे आव्हान त्यांनी लिलया पेलले. यातूनच मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याची घोडदौड सुरू असून, भारतातील एक आदर्श साखर कारखाना म्हणून नावारूपाला आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना उभा करून चिकोत्रा खोऱ्यात मंत्री मुश्रीफ यांनी औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली. सर्वसामान्य जनता व कष्टाळू कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून व त्यागातून या कारखान्याची निर्मिती मंत्री मुश्रीफ यांनी केली. फार मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत न्यायालयीन लढाया, आर्थिक संकट या सर्वांवर मात करत फारच कमी कालावधीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा भव्य-दिव्य प्रकल्प मोठ्या दिमाखात उभा केला आहे. यामागे मंत्री मुश्रीफ व अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची प्रेरणा तसेच कारखान्यातील अधिकारी व कामगार यांचे योगदान आहे.
आजपर्यंत त्यांना अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागला. आव्हानांचेही संधीमध्ये रूपांतर करण्याची विलक्षण क्षमता मुश्रीफ यांच्यामध्ये आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीस छत्रपती शाहू महाराजांच्या भक्कम अशा विचारसरणीचा पाया आहे. सत्तेत असताना आणि नसतानाही त्यांनी जनतेशी असलेला संवाद कधी कमी होऊ दिला नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना त्यांनी पक्षावरील व नेते शरद पवार यांच्यावरील निष्ठा तसूभरही ढळू दिली नाही. पक्ष सोडून कितीही गेले तरी आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करायचे.
एक पक्ष, एक नेता, एक झेंडा आणि कार्यकर्त्यांचा जपलेला विश्वास त्यांना उपयोगी पडला. कागलच्या गैबी चौकातून मुश्रीफ यांनी ‘आपलं फिक्स आहे, पवार एके ... पवार’ अशी घोषणा दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे घोषवाक्य फेमस झाले. यातच त्यांच्या नेतृत्वाची झलक पाहायला मिळते.
विकासकामांचे सातत्य नसेल तर राजकीय पटलावर टिकून राहणे अवघड असते. खरे पाहता राजकीय पटलावर मिळालेले यश हे सोबत मोठ्या जबाबदाऱ्या घेऊन येते. आजपर्यंतच्या राजकीय जीवनात हसन मुश्रीफ यांना अनेक पदे मिळाली. या सर्व पदांचा वापर त्यांनी शासकीय योजना समाजातील शोषित, दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच केला. निष्ठेने जनतेच्या सेवेची जबाबदारी घेतली म्हणूनच कागल - गडहिंग्लज - उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले. शरद पवार यांच्यावरील निष्ठेचे फळ म्हणून राज्यातील वजनदार असे ग्रामविकास खात्याचे मंत्रिपद मिळाले. याठिकाणीही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत काही पायाभूत निर्णय घेतले. अनुभव आणि लोकाभिमुख निर्णय घेण्याची क्षमता यामुळे नुकतीच त्यांच्यावर कामगार खात्याचीही जबाबदारी शरद पवार यांनी सोपवली. यातूनच त्यांचे नेतृत्व व राष्ट्रवादीतील वजन स्पष्ट होते.
कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न बाळगून ते साकार करण्यासाठी मनातील आराखडा व ते करताना कागलच्या मातीशी असलेले नाते न तोडता राजकारण, समाजकारण व सहकारामध्ये मंत्री मुश्रीफ यांनी आपले वेगळेपण निर्माण केले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी राजकीय कारकीर्द पणाला लावणारा नेता... कार्यकर्त्यांना ताकद देऊन मोठे करणारा नेता... उपेक्षित दीनदुबळ्यांचे अश्रू पुसणारा नेता... अशा अष्टपैलू नेतृत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- अजिंक्य अंकुश पाटील (बी.ई. सिव्हिल) हसुर खुर्द