कोल्हापूर : पंचगंगा घाटाच्या अनेक पायऱ्या निखळल्या आहेत. काही ठिकाणी घाट ढासळलाही आहे. अनेक पायऱ्यांचा सिमेंटच्या दर्जा निघाल्याने त्या ढासळण्याची शक्यता आहे. घाटावर काही ठिकाणचे काँक्रीटही निघाले आहे. परंतु त्याकडे कुणाचे लक्ष नाही. या घाटाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे; परंतु त्याला कधी मुहूर्त लागतो याचीच शहरवासीयांना प्रतिक्षा आहे.कोल्हापुरातील पंचगंगा घाटाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. येथे दीपोत्सवावेळी व जोतिबा यात्रेनिमित्त लोकांचा मेळा जमतो. एरवीही या घाटावर भक्तांचा वावर असतो. विशेषतः अंबाबाई देवी व जोतिबा दर्शनासाठी परजिल्ह्यातून, परराज्यातून येणारे भाविक दक्षिण काशी म्हणून या घाटावर स्नान करतात. भक्तांचा या घाटावर इतका वावर असल्याने घाटाची दुरवस्था झाली आहे. येथे येणारे काही भक्त देवाच्या मूर्ती व फोटो पाण्यात सोडतात किंवा घाटावर सोडतात, पूजेचे साहित्य पूजा करून तसेच ठेवून जातात. याशिवाय निर्माल्यही पाण्यात सोडतात. या मूर्ती व निर्माल्य एकत्रित साठवून ते यथायोग्य पद्धतीने निर्गत केले जात नाही. या ठिकाणी स्नान करणे पवित्र मानले जाते. म्हणून येथे परगावाहून आलेले भाविक या घाटावर स्नान केल्याशिवाय जात नाहीत. जोतिबा यात्रेवेळी तर या घाटावर स्नान करण्यासाठी मोठी गर्दी होते. महिलांसाठी स्नानाची आणि कपडे बदलण्याची सोय नाही. यासाठी बंदिस्त सोय करणे अत्यावश्यक आहे.सूचना फलकांची गरजघाटावर भक्तांना मार्गदर्शन होईल, असे सूचना फलक मराठी, हिंदी, कन्नड भाषेत ठिकठिकाणी लावणे आवश्यक आहे. विशेषतः जोतिबा यात्रा व गणेशोत्सवात मूर्ती विसर्जन वेळी भाविकांना मार्गदर्शक नेमण्याची गरज आहे.
- काँक्रीट उखडले
- मूर्ती, निर्माल्य निर्गत, साठवणूक कुंडाचा अभाव
- महिला स्नान व्यवस्थेचा अभाव
- सूचना फलक कुठेच नाहीत
- मार्गदर्शकांची उणीव