कोल्हापूर : अग्निवीर सैन्य भरतीच्या ठिकाणी स्टेरॉईडचे इंजेक्शन्स आढळल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. राजारामपुरी पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. ११) सकाळीच शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात जाऊन पाहणी केली, तसेच सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या अग्निवीर भरतीच्या ठिकाणी शेकडो तरुणांनी स्टेरॉईडच्या इंजेक्शनचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, खडबडून जागे झालेल्या यंत्रणा रविवारी सकाळीच शिवाजी विद्यापीठातील मैदानावर हजर झाल्या.अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी सैन्य दलातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून झालेल्या स्टेरॉईडच्या वापराची माहिती घेतली, तसेच परिसराची पाहणीही करण्यात आली. तरुणांनी वापरलेले स्टेरॉईड इंजेक्शन्स अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहेत, त्यामुळे त्याची सखोल चौकशी करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सैन्य दलातील अधिकाऱ्यांनीही याची गांभीर्याने दखल घेतली आहे.
पोलिसांनीही केली पाहणीराजारामपुरी पोलिसांनी शिवाजी विद्यापीठाचे मैदान आणि राजाराम कॉलेजच्या मैदानावर जाऊन पाहणी केली. भरतीसाठी आलेल्या काही तरुणांशीही चर्चा करून स्टेरॉईड इंजेक्शनची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
सैन्य भरतीच्या ठिकाणी स्टेरॉईडचा वापर झाल्याची माहिती मिळताच आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भरतीस्थळी जाऊन पाहणी केली. स्टेरॉईड विक्रीच्या मुळाशी जाण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. - अश्विन ठाकरे, सहायक आयुक्त, औषध विभाग
सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांनी स्टेरॉईडचा वापर करणे गंभीर आहे. ‘लोकमत’मधील बातमीची दखल घेऊन तातडीने भरती स्थळाची पाहणी करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. - भगवान शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक