सचिन भोसले
कोल्हापूर : ‘घरची गरिबी; त्यात वडील थॉमस हे खासगी शिक्षक आणि आई सुशीला घरकामासोबतच संसाराला शिवणकाम काम करून हातभार लावीत होती. मी मोठा असल्याने शाळेला जाण्यापूर्वीच आई शिवणकाम करीत असतानाच ती मला बाराखडी आणि अक्षरांची ओळख करून देत होती. शिक्षणाचे महत्त्व मोठे असल्याने आणि त्यात वडीलही खासगी शाळेत शिक्षक असल्याने घरात शिक्षणाचेच वातावरण होते.
दरम्यान, पाचवीतून सहावीत जाताना वर्गशिक्षकांनी गणित कच्चे असल्याचे वडिलांना बोलावून सांगितले आणि माझ्या आयुष्याला कलाटणीच मिळाली...’ प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत होते.आम्ही मूळचे हिंडलगा (जि. बेळगाव)चे रहिवासी. मात्र, वडिलांच्या नोकरीमुळे गडहिंग्लज येथे स्थायिक झालो. मी निपाणी येथील शाळा नंबर तीनमध्ये प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविले. त्यानंतर मराठी विद्यामंदिर हायस्कूल येथे पाचवीला प्रवेश घेतला.
यात पाचवीच्या परीक्षेतील आणि अंतिम परीक्षेच्या निकालानंतर माझ्या अभ्यासाच्या प्रगतीत आमूलाग्र बदल झाला. विशेष म्हणजे माझे वडील शिक्षक असल्याने त्यांना मी कायम शिकत राहावे आणि शिक्षणातील अत्युच्च पदवी घ्यावी, असे वाटत होते.
सहावी ते दहावीपर्यंत मी पहिला नंबर कधी सोडला नाही. पुढे बारावी झाल्यानंतर पुणे येथील गव्हर्न्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळाला. तेथेही मी उच्च श्रेणीत पदवी घेतली. दरम्यान, वडीलही निवृत्त झाले. आता मी नोकरी शोधून घरच्यांना सुख देण्याचा निर्णय घेतला. मात्र, वडिलांनी ‘आमच्यात जीव आहे, तोपर्यंत तुम्ही शिका,’ असे आम्हाला सांगितले. त्यानंतर मी कोल्हापुरातील सायबर येथे एम. बी. ए.साठी प्रवेश घेतला. दोन वर्षांनंतर मी शिवाजी विद्यापीठात पहिला आलो.
या दरम्यान स्पर्धा परीक्षांचीही तयारी करू लागलो. त्यात मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही अव्वल आलो. बी. ई. (मेकॅनिकल) असल्यामुळे मी ‘प्रादेशिक परिवहन’कडे जाण्याचा निर्णय घेतला आणि चंद्रपूर येथे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रुजू झालो.
वडिलांच्या स्वप्नाप्रमाणे मी त्या एस. पी. कॉलेजमधून एलएल. बी. आणि पुढे नागपूर विद्यापीठात पीएच.डी (प्रशासन) यामधून प्रवेश घेतला. अथक परिश्रमांनंतर मला २०१३ साली पीएच. डी. प्रदान झाली आणि २०१४ मध्ये माझे वडील आमच्यातून निघून गेले. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
दरम्यान, माझा धाकटा भाऊ डेव्हिडही पीएच.डी.धारक आहे. तो जी.एस.टी. मध्ये सहायक आयुक्त पदावर काम करीत आहे. बहीण लग्न झाले तेव्हा दहावी उत्तीर्ण होती. त्यानंतर तिने डी. एड. आणि बी. ए. इतके शिक्षणही पूर्ण केले. वडिलांच्या इच्छेप्रमाणे आजही नावीन्याचा ध्यास कायम मनी ठेवून शिक्षण घेत आहे.गणितातील गुणांमुळे आयुष्याला कलाटणीइयत्ता पाचवीमध्ये निपाणीतील मराठी विद्यामंदिर हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यात गुजराथी व अन्य मोठ्यांची मुले असल्याने त्यात प्रथम मी बुजलो. पाचवीच्या अंतिम परीक्षेत मला इंग्रजीला ९९, तर गणिताला ४२ गुण पडले. निकालाच्या दिवशी वर्गशिक्षक माझ्या वडिलांना भेटले. त्यांनी ‘स्टीव्हनच्या गणिताकडे लक्ष द्या, त्याला फारच कमी गुण मिळाले आहेत,’ असे सांगितले.
घरात आम्हा भावंडांमध्ये वडिलांबद्दल आदरयुक्त भीती होती. निकाल बघितल्यानंतर त्यांनी घरी आल्यावर हाक मारली. वडिलांनी ‘तुझे अभ्यासात लक्ष नाही,’ असे खडसावून सुनावले. त्यानंतर सहावीत मी न बुजता प्रत्येक विषयात अव्वल स्थान पटकाविले.
सहावी ते दहावीपर्यंत अव्वल क्रमांक सोडला नाही. त्यानंतर अभियांत्रिकीची पदवी, एम.बी.ए., डी.सी.एम. (संगणक पदविका), एलएल.बी. प्रशासन विषय घेऊन पीएच. डी. पदवी प्राप्त केली. या सर्व शिक्षणात अव्वल क्रमांक सोडला नाही. शिक्षकांनी वडिलांना माझे गणित कच्चे आहे, असे सांगितले नसते तर कदाचित माझा पायाच कच्चा राहिला असता. त्यामुळे प्रत्येक अभ्यास परिपूर्ण करण्याकडे अधिक लक्ष दिले तर यश हमखास आवाक्यात येते, असे मला म्हणावेसे वाटते.